जालना : करवसुलीची कोट्यवधी रूपयांची वसुली होत असली तरी यातून विकास कामे कमी अन् पालिकेची जुनी देणी अदा करण्यासाठी ही रक्कम खर्ची होत असल्याचे चित्र आहे. नगर पालिकेची शहरात कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी पालिकेचे चार ते पाच विशेष पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. पथकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली होत असली तरी ही रक्कम विकास कामांसाठी खचितच खर्च होते. पालिकेला गत चार ते पाच वर्षांपासून जुनी देणी भरपूर आहेत. त्याची फेड करताना पालिकेच्या नाकीनऊ येत आहे. एकूणच करवसुलीच्या रक्कमेतून पालिकेचा मासिक खर्च भागविला जात असल्याचे चित्र आहे. गत दीड महिन्यांपासून पालिकेकडून विशेष कर वसुली मोहीम राबविली जात आहे. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१५ अखेर घरपट्टी व पाणीपट्टी कर मिळून ५ कोटी ३२ लाखांची वसुली करण्यात आली.यात घरपट्टी वसुलीचे प्रमाण ३४ टक्के आहे. यातून ३ कोटी ८ लाख आहे. तर पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण २७ टक्के असून २ कोटी २४ लाखांची वसुली झाली आहे. दोन्ही कर मिळून पाच कोटींची वसुली झाली असली तरी यातून विकास कामांसाठी कमी मात्र कर्मचाऱ्यांची जुनी देणी, पालिका तसेच आरोग्य केंद्रांचे वीज बिले, अन्य मासिक खर्च भागविला जात आहे. पालिका विकास कामांसाठी या वसुलीचा अत्यल्प भाग वापरला जात असल्याचे वास्तव आहे. करवसुलीच्या रकमेतून पालिकेने शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करावीत अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. परंतु ही अपेक्षा पालिकेच्या जुन्या थकबाकीमुळे करणे मुख्याधिकाऱ्यांना जिकिरीचे जात आहे. (प्रतिनिधी)
विकास कामांसाठी अत्यल्प रक्कम..!
By admin | Updated: January 5, 2016 00:05 IST