नजीर शेख , औरंगाबादमहापालिकेच्या निवडणुकीत २८ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी २५ जागा जिंकणाऱ्या मजलिस- ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) ने मतदानाच्या टक्केवारीत शिवसेनेला मात दिली आहे. एकूण ५ लाख २९ हजार ९६५ मतांपैकी ८७ हजार ४११ मते एमआयएमला मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला ७६ हजार २९७ इतकी मते मिळाली आहेत.एमआयएम आणि सेनेच्या खालोखाल भाजपला ६८ हजार १५५ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला ६१ हजार १८२ नागरिकांनी मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस या बड्या पक्षाला केवळ २५ हजार २५२ इतके मतदान झाले. बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली असून, त्यांना १४ हजार १९१ मते मिळाली आहेत. निवडणूकपूर्व काळात एमआयएम आणि सेना- भाजप युतीच्या संघर्षाची चर्चा झडली असली तरी प्रत्यक्षात पाच ते सहा वॉर्डात एमआयएम आणि युती अशी लढत झाली.शिवसेनेचे सर्वाधिक २८ नगरसेवक निवडून आले. त्यांचा एक पुरस्कृत उमेदवार निवडून आला. एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आले. भाजपचे २२ आणि एक पुरस्कृत, असे २३ नगरसेवक आहेत. याशिवाय काँग्रेसचे १०, बहुजन समाज पक्षाचे ५ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ नगरसेवक निवडून आले. डेमॉक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाचेही दोन नगरसेवक सभागृहात असतील. इतर छोट्या पक्षांपैकी भारिप- बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, पँथर्स रिपा, रिपब्लिकन सेना, भाकप आदी पक्षांचा एकही सदस्य निवडून आला नाही. १६ अपक्ष नगरसेवक मात्र निवडून आले. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास सर्वाधिक १६.४९ टक्के मते एमआयएमला मिळाली आहेत. शिवसेनेला १४.८४ टक्के तर भाजपला १२.८६ टक्के मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला कशीबशी ४.७६ अशी टक्केवारी गाठता आली. बहुजन समाज पक्षाने २.६७ टक्के मते प्राप्त केली आहेत. एकूण मतदानापैकी एमआयएम, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसप या प्रमुख पक्षांना मिळून ६३.१६ टक्के मते मिळाली. मात्र, अनेक छोटे पक्ष आणि अपक्षांना मिळून ३६.८४ टक्के इतकी लक्षणीय मते मिळाली. सत्तेत जाणाऱ्या पक्षापेक्ष़ा ही मते अधिक आहेत. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक पक्ष संघटना आणि अपक्षांची गर्दी होते, त्यामुळे प्रमुख पक्षांच्या मतांच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होतो. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बहुसंख्येने मतदान प्रमुख पक्षांनाच होते. त्यामुळे त्याठिकाणी प्रमुख पक्षांची मतदानाची टक्केवारी अधिक असते. राष्ट्रवादी काँग्रेसने ७४ जागा लढविल्या होत्या. त्यामध्ये त्यांच्या २७ उमेदवारांना शंभरच्या आत मते मिळाली. भाजपने ४४ जागी उमेदवार दिले होते. त्यापैकी केवळ दोन वॉर्डात त्यांना शंभरी गाठता आली नाही.४काँग्रेसला १०३ पैकी २० वॉर्डात शंभरी गाठता आली नाही. बहुजन समाज पक्षाने २४ उमेदवार दिले होते. त्यापैकी तीन वॉर्डात त्यांना शंभरच्या आत मते पडली. शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांनी उभ्या केलेल्या सर्व वॉर्डात शंभरपेक्षा अधिक मते पडली आहेत. शिवसेनेचा नीचांक १९२ मतांचा आहे तर एमआयएमचा नीचांक १३२ मतांचा आहे. या निवडणुकीत शिवसेनेने ५४ ठिकाणी उमेदवार उभे करून २९ उमेदवार निवडून आणले. उमेदवार निवडून येण्यात सेनेला ५३.७० टक्के यश आले. तर भाजपने ४४ ठिकाणी उमेदवार देऊन २३ नगरसेवक सभागृहात पाठविले. त्यांची यशाची टक्केवारी ५२.२७ इतकी आहे. ४एमआयएमने ५० ठिकाणी उमेदवार देऊन २५ नगरसेवक निवडून आणत ५० टक्के यश संपादन केले. तर बहुजन समाज पक्षाने २४ ठिकणी उमेदवार देऊन ५ ठिकाणी यश प्राप्त केले. त्यांची यशाची टक्केवारी २०.८३ इतकी येते. ४काँग्रेसने १०३ वॉर्डात आपले उमेदवार दिले, मात्र त्यांचे केवळ १० नगरसेवक निवडून आले. त्यांना ९ टक्के यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसला ४.५ टक्के यश मिळाले. त्यांनीही ७४ ठिकाणी आपले उमेदवार दिले होते. ४सेना आणि भाजपने लढविलेल्या जागांचा आणि त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांचा विचार करता शिवसेना हा जुळ्यांपैकी आधी जन्मलेल्या मोठ्या भावासारखा असल्याचे दिसते.
एमआयएमला मिळाली सर्वाधिक मते
By admin | Updated: April 26, 2015 01:02 IST