उस्मानाबाद : एकविसाव्या शतकात विज्ञानाची कास धरुन वावरणारा माणूस साप व नागाच्या बाबतीत आजही काही गैरसमजूतीमध्ये अडकलेला दिसतो. सापाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज असल्याचे समोर येते. साप दूध पीत नाही. तरीही त्याला नागपंचमीदिवशी दूध पाजविले जाते. प्रत्यक्षात दुधामुळे सापाच्या पचनसंस्थेत बिघाड होऊन त्याच्या जिवास धोका होऊ शकतो. तसेच विविध रसायनमिश्रीत हळद-कुंकू हे देखील सापाच्या जिवावर बेतणारे ठरू शकतो, असे येथील सर्पमित्र राकेश वाघमारे यांनी सांगितले. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी आहे. भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आले, तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. त्यामुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी शेतकरी शेतामधील नांगरणी कुळवणी असे काम करत नाहीत. घरीसुद्धा भाज्या चिरायच्या नाहीत, तवा टाकायचा नाही असे नियम पाळले जातात. नागपंचमी सणासाठी सासरवाशीन मुलीला माहेरी आणले जाते. या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. नागाला दूध, लाह्या व काही ठिकाणी गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो.सर्पदंश झाल्यानंर कुठलीही घरगुती औषधी न देता काही प्रथमोपचार करून तातडीने डॉक्टरांना दाखविणे गरजेचे असल्याचे सांगत जिल्ह्यात मुख्यत्वेकरुन सापाच्या २८ ते ३० प्रजाती आढळून येतात. त्यापैकी केवळ सहा जातीचे साप हे विषारी आहेत. सापाला कान नसतात, हे सर्वांनाच माहिती आहे. साप हा हलत्या वस्तूंकडे आपले लक्ष केंद्रित करतो. शिवाय साप डुख धरतो, हा समजही चुकीचा आहे. सध्या बाजारात असले हळद, कुंकू हे देखील नैसर्गिक राहिलेले नाही. त्यामुळे यापासूनही सापाच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी सापाच्या अंगावर हळद, कुंकू टाकू नये तसेच खबरदारी म्हणून सापाची पूजा करताना पाच-सात फूट लांब उभे रहावे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)विडा नाही, औषधांची गरजसाप चावल्यास तो मनूष्य दगावणार नाही यासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. मात्र आजही सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. ग्रामीण भागात आजही सर्पदंश झाल्यानंतर त्या रुग्णास दवाखान्यात न नेता विडा दिला जातो. अनेक वेळा चावणारे साप हे विषारी नसल्याने रुग्ण मरत नाहीत व नागरिकांचा विड्यावरचा विश्वास वाढतो. मात्र एखाद्यावेळेस चावणारा साप विषारी असेल व त्या रुग्णावर वेळेवर उपचार झाले नाही तर त्याचे प्राण जावू शकतात. त्यामुळे सर्पदंश झाल्यास त्वरित इंजेक्शन व औषधीच देण्याचा सल्ला डॉक्टर देतात.असे ओळखा विषारी सापजिल्ह्यात नाग, मण्यार, फुरसे, घोणस, वॉल्सेन मण्यार यासोबतच काही प्रमाणात पोवळा या जातीचे विषारी साप आढळून येतात. नाग : हा साप फणा काढतो, हीच याची मुख्य ओळख आहे. मण्यार : या सापाचा रंग काळा असतो व त्याच्या शरीरावर वर पांढरे पट्टे असतात. तसेच हा साप फक्त रात्रीच आढळतो.घोणस : हा साप अजगराच्या पिल्लासारखा असतो. याचे तोंड मोठे आणि त्रिकोणी असते. याच्या अंगावर बदामाच्या आकाराचे ठिपके असतात. तसेच जवळ गेल्यास तो कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढतो.फुरसे : या जातीचा साप एक ते दीड फूट लांबीचा असतो. याच्या डोक्यावर अधिक चिन्ह असते. त्यामुळे फुरसे लगेचच लक्षात येतो. त्याच्या जवळ गेल्यानंतर तो त्वचा एकमेकांवर घासून करवतीने लाकूड कापल्यासारखा आवाज करतो.
दूध, हळद-कुंकू सापाच्या आरोग्यास हानीकारक
By admin | Updated: August 1, 2014 00:27 IST