कडा: येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात तब्बल ३०० मुलांना रायफल चालविण्यासह इतर प्रशिक्षण देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुलांनाही सैन्याची शिस्त लागली जात आहे. ‘परेड सावधान, अॅक्शन, फायर आणि ठाय- ठाय’ असा आवाज सध्या कडा परिसरात घुमू लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिस्त लागावी, पुढील आयुष्यात पोलीस व सैन्यदलात काम करण्यासाठी अनुभव यावा तसेच विद्यार्थ्यांना विविध कला येण्यासह त्यांचे शरीर काटक बनावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रशिक्षक विठ्ठल तांदळे यांनी सांगितले.या विद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी पालकांमध्येही आता उत्सुकता असल्याचे तांदळे यांनी सांगितले. शालेय अभ्यासक्रमा बरोबरच ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांनी सैनिक प्रशिक्षणासाठी अनुमती आहे. अशाच विद्यार्थ्यांना यामध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना धावणे, उंचउडी, लांब उडी, भुईसपाटी, रायफल चालविणे आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाबरोबरच युद्ध प्रसंगीचे प्राथमिक धडेही दिले जात आहेत. समोरच्यावर आक्रमण कसे करावे, आक्रमण करताना कोण्या बाबीची काळजी घ्यावी यासह वेळ प्रसंगी आपले संरक्षण कसे करावे, याचेही यावेळी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच सकाळी १० ते ११ या वेळेत रायफल चालविण्या संदर्भात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरम्यान, आष्टी तालुक्यात प्रथमच असा उपक्रम चालविला जात असल्याचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके यांनी सांगितले. सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी या विद्यालयात मुलांची व मुलींची अशा वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्याचे हेमंत पोखर्णा यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांकडून सामाजिक कार्यही करून घेतले जात आहे. (वार्ताहर)
३०० विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण
By admin | Updated: July 24, 2014 00:07 IST