औरंगाबाद : सामाजिक संस्थांना रिझर्व्ह बँकेकडून विदेशी फंडातील रक्कम दिली जात असल्याची थाप मारून राज्यभरातील अनेकांना गंडा घालणाऱ्या जंगम टोळीने मुंबईच्या एका मेटल व्यापाऱ्यालाही एक कोटी ५८ लाख ५० हजार रुपयांचा चुना लावला आहे. नावाचे साधर्म्य साधून फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी केला असून, दोषारोपपत्र दाखल केल्यानंतरही तपास सुरूच आहे. बुधवारी (दि.१३) पोलिसांनी मेटल व्यापाऱ्याचा जबाब नोंदविला. मुख्य आरोपी अशोक जंगम, निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट हे तिघे अटकेत आहेत. न्यायालयाने त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईतील मेटल व्यापारी मनोहर फुलचंद कानुनगो (५९, रा. श्रीपती आर्केड, नानाचौक) यांची २0१0 मध्ये निवेदिता कुलकर्णी हिच्याशी ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत तिने आपल्या संस्थेला विदेशी फंडाचा पैसा मंजूर करण्यात आल्याचे कानुनगो यांना सांगितले. त्यानंतर तिने कानुनगो यांनाही यात पैसे गुंतविण्यास भाग पाडले. तिच्या आमिषाला बळी पडून कानुनगो यांनी गुंतवणूक केली. जंगमने कानुनगो यांना आपण रिझर्व्ह बँकेतील अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवले होते, तर अवचटने आपण निवेदिताचा स्वीय सहायक असल्याची थाप मारली होती. त्यानंतर कानुनगो यांनी वेगवेगळ्या तारखांना मुंबईच्या युनियन बँकेच्या खात्यात रक्कम जमा केली होती. त्यानंतर तिघा आरोपींनी कानुनगो यांना गंडा घातला. पुढील तपास उपनिरीक्षक सुभाष खंडागळे करीत आहेत.
मेटल व्यापाऱ्यालाही घातला दीड कोटीचा गंडा
By admin | Updated: April 16, 2016 01:43 IST