जालना : भगवद् गीता असो अथवा कुराण, सर्वच धर्मग्रंथांमध्ये एकता व समानतेचा संदेश दिला आहे. प्रत्येक ग्रंथात एकमेकांचा सन्मान ठेवावा, असे म्हटले असल्याचे मत गीता पठण स्पर्धेत विजेती ठरलेल्या मरयम सिद्दीकी हिने बुधवारी येथे मांडले. जालना येथे शेख माजेद मित्र मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात मरयम व तिचे वडील आसेफ सिद्दिकी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मरयम हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विष्णू पाचफुले, महावीर ढक्का, शेख माजेद, शशिकांत घुगे, मिर्झा अन्वर बेग, इसा खान उपस्थित होते.मरयम म्हणाली, इस्कॉनच्या वतीने भगवद् गीता पठण स्पर्धा आयोजित केली होती. यात गीताचे उत्कृष्ट सादरीकरण व पठण केल्याने तिला यश मिळाले. जन्माने मुस्लिम असले तरी भगवद् गीता ग्रंथ मला आवडतो. यातील सर्वच श्लोकातून मानवी जीवन मूल्यांची शिकवण दिली आहे. सातवीत शिकणाऱ्या मरयमने भागवत गीतेतील ‘यदा यदा ही धर्मस्य...’ हा श्लोक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्लोक सादर करण्यासोबतच याचा अर्थही तिने सहज शब्दात विषद केला.
सर्वच धर्मग्रंथांतून एकतेचा संदेश
By admin | Updated: December 23, 2015 23:38 IST