जालना : यंदा मार्च महिन्यातच पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. शनिवारी जालन्याचा पारा तब्बल ४१ अंशांवर गेल्याने उष्णतेमुळे शहरवासियांचे हाल झाले. दुपारनंतर सर्वच रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. काही रस्ते निर्मुनष्य झाल्याचे चित्र होते. एकूणच कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. शहरवासियांना मे हिटचा अनुभव येत आहे.दोन दिवसांपासून पारा ३८-३९ अंशांवर स्थिरावत होता. शनिवारी दुपारी १ ते ४ वाजे दरम्यान उन्हाचा पारा ४१ अंशांवर गेला होता. सकाळी १० वाजता ३२ अंशांवर असणारे तापमान दुपारी ४ वाजता ४१ अंशावर गेले होते. उष्णतेच्या तीव्रतेमुळे आबालवृद्धांचे हाल होत असून, काहींनी घराबाहेर पडणे टाळले. तालुकास्थानेही कडक उन्हामुळे चांगलीच तापली होती. यात प्रामुख्याने बदनापूर, भोकरदन, जाफराबादचे तापमान ३७ अंश होते. तर घनसावंगी, अंबड, परतूरचे तापमान ३८ अंश होते. मंठ्याचे तापमान वाढले असून, शनिवारी पारा ३९ अंशांवर गेला होता. शहरासोबतच ग्रामीण भागातही उन्हामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जानेवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे काही काळ दिलासा मिळाल्यानंतर उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली आहे. तापमानात वाढ होत जाईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. गत वर्षी याच दिवशी तापमान ३८ अंश एवढे होते. यावर्षी यात तब्बल ३ अंशांनी वाढ होऊन ४१ पर्यंत केले. कडक उन्हाचा फटका भाजीपाला उत्पादनावर होत आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे जलसाठ्यांतही झपाट्यान घट झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तापमान वाढत असल्याने ग्रामीण भागातील आठवडी बाजारावर परिणाम होत आहे.लग्नसराईचे दिवस असूनही कडक उन्हामुळे गर्दी रोडावत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे अर्थचक्रावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. कडक उन्हामुळे थंडपेयांची विक्रीत चांगली वाढ झाली आहे. शहाळे, टरबूज, द्राक्ष तसेच उसाच्या रसासह इतर शीतपेयांना मागणी वाढली आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून बहुतांश नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. उन्हामुळे रुग्णालयांत गर्दी वाढत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, रूमालांची मागणी वाढत आहे.
पारा गेला ४१ अंशावर !
By admin | Updated: March 27, 2016 00:10 IST