हिंगोली : जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीत मागच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी शिवसेना अधिक सतर्क असल्याचे दिसते. थोडीही दिरंगाई झाल्यास फोडाफोडीच्या राजकारणाला बळकटी मिळणार असल्याची जाणीव असल्याने जि. प. सदस्य सहलीवर पाठविण्याची तयारी शुक्रवारी सुरू होती. जि. प. पदाधिकारी निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. २१ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून इतर मागासप्रवर्गाच्या महिलेसाठी अध्यक्षपद राखीव आहे. जि. प. सभागृहात शिवसेना- २७, राष्ट्रवादी-१0, कॉंग्रेस-९ व अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल आहे. जि. प. पदाधिकारी निवडीत गट - तट उफाळण्याची शक्यता सुरुवातीला निर्माण झाली होती. लोकसभेत ताणलेले पक्षांतर्गत संबंध शिवसेनेला जि. प. तील सत्ता गमावणारे ठरतील, असेच एकंदर चित्र होते. मात्र परिस्थिती हळूहळू बदलत गेली अन् आता ती अगदी सुरळीत झाल्याचे वरवर तरी भासवले जात आहे. निदान जि. प. पदाधिकारी निवडीवर परिणाम करणार नाहीत, हेही तेवढेच खरे.या पार्श्वभूमीवर जि.प.सदस्यांना सहलीवर पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. सदस्यांची जमवाजमव केली जात होती. प्रत्येकाला निरोप देण्याचे काम सुरू असल्याचे पहावयास मिळाले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होणार आहे. तोपर्यंत सदस्यांना बाहेर ठेवून दगाफटका टाळण्याचा प्रयत्न होत आहे. तर कॉंग्रेस-राकॉंच्या गोटात मात्र शांतता दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सदस्य सहलीवर
By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST