लोहारा : सामाईक शेतातील सातबाऱ्यावरून तीन आपत्यांची नावे कमी करून शेतजमिनीची समान विभागणी करून तक्रारदाराचे वडील व चुलत्याच्या नावे करून तसा सातबारा देण्यासाठी २००० रूपयाची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह एका ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले़ ही कारवाई होळी (ता़लोहारा) येथे मंगळवारी दुपारी करण्यात आली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, होळी येथील एका शेतकऱ्याने तलाठी राजेंद्र रामराव भोसले (वय-५७) यांना मागील दोन-तीन महिन्यापूर्वी वडील, चुलते व तीन आपत्यांच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित सामाईक शेतीच्या सातबाऱ्यावरून तीन आपत्यांची नावे कमी करून वडील व चुलते यांच्या नावाने समान विभागणी करून तसा सातबारा देण्याची मागणी केली होती़ या कामासाठी तलाठी भोसले यांनी प्रारंभी १० हजार रूपये मागितले होते़ वारंवार भेटूनही तलाठ्यांकडून मागणी होत असल्याने शेतकऱ्याने उस्मानाबाद येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभगाच्या उपाधीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी होळी येथे सापळा रचला़ त्यावेळी तक्रारदाराच्या कामासाठी २००० रूपयांची लाच घेणारे तलाठी राजेंद्र रामराव भोसले व ग्रामपंचायत सदस्य राम प्रभाकर जाधव या दोघांना रंगेहाथ जेरबंद करण्यात आले़ या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)होळी येथे शेतकऱ्याकडून २००० रूपयाची लाच घेताना तलाठी राजेंद्र रामराव भोसले यांच्यावर मंगळवारी एसीबीने कारवाई केली़ विशेष म्हणजे भोसले यांचे चिरंजीव उस्मानाबाद येथील महिला व बाल कल्याण विभागात संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना अत्याचार प्रकरणातील पीडित महिलेला मनोधैर्य योजनेंतर्गतचे अनुदान देण्यासाठी २० हजार रूपये घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला होता़ मुलानंतर त्याचे तलाठी वडीलही एसीबीच्या जाळ्यात सापडल्याने चर्चेला ऊत आला आहे़
तलाठ्यासह सदस्य जेरबंद
By admin | Updated: September 16, 2015 00:31 IST