औंढा नागनाथ : जनता व शेतकऱ्यांची कामे वेळेत करण्यासाठी त्याच प्रमाणे तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी दुपारी ४ वाजता तलाठ्यांच्या बैठकीचे आयोजन तहसीलदार श्याम मदनुरकर यांनी केले असून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तलाठ्यांनी कामे करण्याच्या लेखी सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.औंढा नागनाथ तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांना तलाठ्यांकडील विविध कामे व प्रमाणपत्रे घेण्यासाठी तलाठ्यांचे ठिकाण गाठावे लागते. त्यामुळे त्यांची वेळेमध्ये कामे होत नव्हती. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ने याची विशेष दखल घेवून ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. त्यादृष्टिकोणातून पाठपुरावा सुरू केला. याची जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी दखल घेवून तहसीलदारांना तलाठ्यांना कामाचे वेळापत्रक तयार करून जनतेची कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याची गंभीर दखल तहसीलदार शाम मदनुरकर यांनी घेतली आहे. त्यांनी जनतेची व शेतकऱ्यांची कामे त्याच प्रमाणे तलाठ्यांकडे दिलेल्या तक्रारींचा योग्य निपटारा करण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक बुधवारी दुपारी ४ वाजता तलाठ्यांच्या बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयामध्ये केले आहे. तशा लेखी सुचना तलाठ्यांना दिल्या आहेत. बैठकीमध्ये तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे मदनुरकर यांनी सांगुन यामुळे शासनाच्या योजना व कामे जलदगतीने होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. या अभिनव योजनांमुळे तलाठ्यांकडील कामाचा ताण मात्र वाढणार आहे. तालुक्यामध्ये तलाठ्यांनी कामकाजाचे वेळापत्रक दिले आहे. त्या वेळापत्रकाप्रमाणेच तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणी जावून कामकाज करण्याच्या लेखी सूचना देखील तहसीलदार मदनुरकर यांनी दिल्या आहेत. (वार्ताहर)
दर बुधवारी होणार तलाठ्यांची बैठक
By admin | Updated: July 8, 2014 00:37 IST