औरंगाबाद : मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीसाठी २८ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११.३० वा. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील. बैठकीस सर्व सरकारी विभागाचे खातेप्रमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध खात्यांचे २३ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री येणार आहेत. तसेच मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह अव्वर सचिव, प्रधान सचिव, सचिव. उपसचिव, संचालक, आयुक्त प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती राहील. दरम्यान, आजही अप्पर आयुक्त जी. एम. बोडखे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्तालयातील विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी विविध समित्या गठीत केल्या जाणार आहेत. विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे. बैठकीसाठी मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव, उपसचिव, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक आदींचे एक पथक २ आॅक्टोबरला येईल. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक होईल, असे लेखी पत्र विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे; परंतु त्यात तारखेचा उल्लेख नाही. मात्र, ४ आॅक्टोबर ही तारीख पक्की मानली जात आहे.