औरंगाबाद : इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात विदेशी कंपन्यांचा वाढलेला दबदबा लक्षात घेता दोन वर्षांपूर्वीच केंद्र शासनाने देशभरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांना चालना देण्यासाठी तब्बल ५० ठिकाणी क्लस्टर तयार करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादेतही इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणीसाठी आज सीएमआयए या औद्योगिक संघटनेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एटरप्राईजेसच्या कंपन्यांना शासन लॅब टेस्टिंग आणि एक्सपोर्ट प्रमाणपत्रासाठी येणारा खर्च देईल. त्याचप्रमाणे उद्योजकांना एकाच छताखाली लहान-मोठ्या अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून क्लस्टर उभारण्यात येणार आहे.दरम्यान, आज चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) कार्यालयात अध्यक्ष मुनीष शर्मा, माजी अध्यक्ष मिलिंद कंक, उपाध्यक्ष आशिष गर्दे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. बैठकीत आयएसएचे उपाध्यक्ष केतुल आचार्य, श्रावणी शर्मा यांनी योजनेचे स्वरूप आणि व्याप्ती विशद केली. एकूण ५० कोटींच्या या प्रकल्पात सुमारे १.६ एकर जागा किमान आवश्यक आहे. पन्नास कोटींमध्ये उद्योजकांना १५ टक्के वाटा टाकावा लागेल. क्लस्टरसाठी अर्ज करण्याच्या नियमावलीत किमान सात उद्योजकांचा एक संच असावा, ही महत्त्वपूर्ण अट आहे. क्लस्टरची औरंगाबादला किती गरज आहे, याचे सर्वेक्षण करण्यात येईल. सहा महिन्यांत ही सर्व प्रकिया पार पाडावी लागेल. कन्सल्टंट विलास रबडे यांनी योजनेचे फायदे थोडक्यात नमूद केले.बैठकीस शहरातील वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक, लघु उद्योजक, शासकीय संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तज्ज्ञांनी उद्योगांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी बैठक
By admin | Updated: August 21, 2014 00:12 IST