विशाल सोनटक्के , उस्मानाबादअफजल खान युध्दासाठी आला तेव्हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक सिध्दी इब्राहीम हा मुस्लिम तरूण होता, तर अफजल खानाचे बॉडीगार्ड शंकराजी मोहिते आणि पिराजी मोहिते हे मराठी होते. मात्र, आपल्याकडे युध्दशास्त्र या एकाच नजरेने शिवचरित्राकडे पाहिले गेले. वास्तविक शिवचरित्र त्यापलीकडे आहे. त्यावेळच्या प्रत्येक विभागातील जनतेला आपल्याला शिवाजीसारखा राजा पाहिजे, असे का वाटत असेल, याचा कधी विचार केला आहे का? शिवरायांचे अर्थकारण, समाजकारण, राजकारण, दुर्गकारण आपण समजून घेणार आहात का, असा सवाल करीत केवळ ढाल-तलवारीकडे न पाहता भावना बाजूला ठेवून, अभ्यास करून महाराजांवर प्रेम करा, असा सल्ला दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध क्षेत्रात लोकोपयोगी कार्य केले. त्यांच्याकडे क्षितीजापलिकडे पाहण्याची दूरदृष्टी होती. त्यांच्यातील या गुणांचा विविध अंगाने अभ्यास व्हायला हवा. मात्र, आम्ही अजूनही शिवजयंती कधी आणि पुण्यतिथी कधी, याच्या पुढे जायला तयार नसल्याची खंतही मांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. महाराजांच्या वास्तूशिल्प रचनेचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. त्यांनी ‘कासा’ उर्फ ‘पद्मदुर्ग’ बांधला. त्यात चुना वापरण्यात आला आहे. खाऱ्या पाण्याच्या माऱ्यामुळे आज या किल्ल्याच्या तटबंदीचे दगड झिजलेत. मात्र, दोन दगडांच्या मधील चुना तसाच आहे. या बांधकाम शास्त्राचा अभ्यास व्हायला हवा. कुलाब्याचा किल्ला बांधताना मोठमोठे ‘ब्लॉक्स’ एकावर एक ठेवून त्यात फटी सोडल्या. लाट आल्यानंतर त्या फटीतून पाणी आत जाते आणि ओसरली की ते त्याच फटीतून बाहेर पडते. त्यामुळेच आज हा किल्ला चारशे वर्षानंतरही उभा आहे. असेच वेगवेगळे तंत्र प्रत्येक किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आले आहे. मात्र, अद्यापही त्याच्या अभ्यासाकडे आपला कानाडोळा असल्याचे ते म्हणाले. मुंबईत खांदेरी येथे महाराजांनी मायनाक भंडारी यास आदेश देवून किल्ला बांधला. याचे काम झाल्यानंतर उरलेली दगडे त्यांनी तटबंदीच्या खाली टाकण्यास सांगितले. दगडावर चढून कोणी येईल, असे सांगितल्यानंतरही ते म्हटले, येऊ द्या. काही वर्षांनी खाऱ्या पाण्यावर ‘कोरल’ वाढलं. त्यामुळे या दगडावर पाय दिला की तो कापतो. पायावरील या जखमेला खारं पाणी लागलं की त्याची काय अवस्था होत असेल, याची कल्पना करा. महाराजांनी केवळ किल्लेच बांधले नाहीत तर, त्याच्या खर्चाचे नियोजनही केले होते. त्यासाठी खास ‘बजेट’ होते. आज दरवर्षी दुष्काळ पडतो आहे. टँकरमुक्तीच्या घोषणा कागदावरच उरताना महाराजांच्या नियोजनशैलीचा वापर करणार आहोत की नाही? असा सवाल त्यांनी केला. पुणे शहराला आज चार धरणांतून पाणी पुरवठा होतो. एखाद्या वर्षी पाऊस न झाल्यास अख्खे पुणे उद्ध्वस्त होईल. मात्र, अद्यापही आपण गंभीर नसल्याची खंत मांडे यांनी व्यक्त केली. महाराज धुरंधर होते. सिध्दी जोहरच्या तावडीतून निसटून विशाळगडला सुखरूप पोहोंचल्यानंतर सिध्दी जोहरने पैसे घेऊन महाराजांची सुटका केली, अशी अफवा पसरली. ही माहिती विजापूरला कळाली. आदिलशहाने पैसे घेऊन ताबडतोब ये, असा दम भरला. पैसे घेतलेच नव्हते तर देणार कुठून? त्यामुळे सिध्दी जोहर विजापूरला न जाता करनूरला गेला आणि तेथेच त्याने आत्महत्या केली. एका अफवेवर शत्रुतील एक मोठा सेनापती संपला. अशीच बाब अफजल खानाने मंदिरावर केलेल्या हल्ल्यासंबंधीही आहे. पंढरपूरसह इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या मंदिरातील मूर्ती अफजल खानाने फोडल्याची त्या काळात अफवा पसरली. अफजल खानाच्या सैन्यात हजारो हिंदू सैनिक होते. मूर्ती तोडल्याच्च्या बातमीने ते बिथरले हे युध्द शास्त्राचे तंत्र होते. तरबेज शिवरायांनी अशा विविध क्लुप्त्यांच्या माध्यमातून बलाढ्य शत्रुंना लोळविले. आग्रा येथून महाराज कसे निसटले, याचे कोडे आज साडेतीनशे वर्षानंतरही उलगडत नाही. शाहिस्तेखानाच्या लाखाच्या फौजेत दोन-चारशे मावळे घुसतात कसे? आणि शामियान्यापर्यंत पोहोचून एकट्या शाहिस्तेखानाला बाजुला काढून त्याच्यावर हल्ला करतात हे सारे अभ्यासाचे विषय असल्याचे ते म्हणाले. शिवशाहीचे त्याकाळी एक कोटी उत्पन्न होते. तर औरंगजेबाचे उत्पन्न २२ कोटींहून अधिक असताना शिवाजी महाराज अशा बलाढ्य शत्रुसमोर डगमगले नाहीत. ते त्यांच्या अभ्यास आणि धुरंधर वृत्तीमुळेच. अशा शिवरायांच्या विविध क्षेत्रातील सखोल अभ्यासाची आज गरज आहे. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा स्वाभिमान टिकेल, त्यांचे स्थैर्य टिकून राहील, अशीच धोरणे राबविली. मिठाच्या आयातीमुळे शेतकरी हवालदिल झाला तेव्हा, बाहेरुन येणाऱ्या मिठावर त्यांनी मोठा टॅक्स लावला होता. आज भारतापेक्षा चीनमधील माल आपल्याकडे लोकप्रिय होतो. कारण तो स्वस्त पडतो. याला आजची धोरणे कारणीभूत आहेत. त्यामुळेच केवळ हिंदू-मुस्लिम संघर्षापुरते शिवशाहीकडे पाहू नका. तो संघर्ष उगाळून आज काहीही साध्य होणार नाही. तर शिवचरित्र अभ्यासा. त्यातून आज आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरेही सापडतील.
मावळ्यांनो, भावना बाजूला ठेवून शिवचरित्र अभ्यासा
By admin | Updated: February 19, 2015 00:44 IST