जालना : मराठवाडा स्वतंत्र झाला वाटत असले तरी आज ही आपण पारतंत्र्यात जगत आहोत. ते म्हणजे निसर्गाचे पारतंत्र्य आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी उद्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त एक संघ होऊन मदत करावी. त्या मदतीतून धरणातील गाळ काढणे, छोटे बंधारे बांधणे असे उपक्रम केल्यास निश्चितच या पारतांत्र्यातून बाहेर पडता येईल, असे मत प्रभारी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी व्यक्त केले.गणेश उत्सवानिमित्त आयोजित गणेश मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम, तहसीलदार रेवणनाथ लबडे, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, नगराध्यक्षा पार्वता रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, गणेश महासंघाचे अध्यक्ष सुनील आर्दड आदींची उपस्थिती होती.पोलिस अधीक्षक तांबे म्हणाले, गणेशोत्सव हा पोलिसांचा उत्सव नाही. तो तुमचा सर्वांचा उत्सव आहे. तो कसा साजरा करायचा ते तुम्हीच ठरवा. विर्सजन वेळेत करायचे की नंतर, डॉल्बी बाजवायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे. मात्र पोलिस आपले कर्तव्य पार पडणार आहे. रात्री १२ वाजेनंतर मिरवणुकीत डॉल्बी व इतर वाद्य वाजविल्यास त्याचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी मात्र त्या आधारे संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा देवून ते म्हणाले की, आज मराठवाड्यात सर्वत्र भीषण असा दुष्काळ आहे. त्याची चर्चा राज्यभर होत असल्याने राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. तुमच्यावरील निसर्गाच्या संकटामुळे मदतीची भावना त्यांच्यात झाली आहे. अभिनेत्यांपासून अनेक जण मदतीसाठी धावून येत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही गणेश उत्सवावर मोठा खर्च केल्यास मदत करणाऱ्यांचीही मने दुखावली जाऊ शकतात. त्यामुळे लहान मूर्ती स्थापन करून खर्चाला आळा घाला. जमा झालेल्या वर्गणीतून शेतकऱ्यांना मदत करा, दुष्काळाच्या संकटाला आव्हान म्हणून समोरे जावून निसर्गाच्या पारतांत्र्यातून मराठवाड्याला बाहेर काढण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह येथील उद्योजक, व्यापारी सर्वच घटकांनी एक संघ येवून या पारतंत्र्याचा मुकाबला करावा. योगा योगाने उद्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसग्रामच्या दिवशीच गणेश स्थापना होत असल्याने या कार्याचा श्रीगणेशा करावा असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
मराठवाडा निसर्गाच्या पारतंत्र्यात जगतोय
By admin | Updated: September 17, 2015 00:25 IST