बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सतत घडणा-या प्राणांतिक अपघातांमुळे विविध रस्ते आणि चौकांना पोलिसांनी काळ्या यादीत टाकले आहे. या दहा ब्लॅक स्पॉटस्चे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने नुकतेच सर्वेक्षण केले. अपघात रोखण्यासाठी या ब्लॅक स्पॉटस्वर करावयाच्या उपाययोजनांच्या शिफारशींसह अहवाल वाहतूक आयुक्तांना पाठविला.दरवर्षी शहरात पाचशेहून अधिक अपघात घडतात. या अपघातांत अनेकांना प्राण गमवावा लागतो आणि शेकडो जखमींना कित्येक दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. यात उपचारांवर लाखो रुपये खर्च होतो आणि काहींना कायमस्वरूपी अपंगत्वही येते. अपघातामुळे होणारे नुकसान कधीही भरून निघत नाही. यामुळे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांसह आरटीओ, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांची संयुक्त समिती आहे. सतत होणारे अपघात रोखण्यासाठी या समितीने पंधरा दिवसांपूर्वी आयुक्तालय हद्दीतील अपघातामुळे पोलिसांच्या यादीत ब्लॅक स्पॉटस् ठरलेल्या १० ठिकाणांचे सर्वेक्षण केले. सिडको वाहतूक शाखेच्या हद्दीअंतर्गत सर्वाधिक सहा ब्लॅक स्पॉटस् असल्याचे समोर आले. यात हर्सूल टी-पॉइंट, केम्ब्रिज शाळा चौक, एअरपोर्ट टी-पॉइंट, रामनगर चौक, मुकुंदवाडी चौक, देवळाई चौक यांचा समावेश आहे, तर शहर वाहतूक विभागांतर्गत बीड बायपास रस्त्यावर तीन ब्लॅक स्पॉटस् आहेत. बीड बायपासवर एमआयटी हॉस्पिटल चौक, रेणुकामाता मंदिर कमानीजवळ, मास्टर कुक हॉटेलजवळ तसेच संग्रामनगर रेल्वे ओव्हर ब्रीजवरून खाली आलेला रस्ता आणि गोदावरी टी-पॉइंट यांचा यात समावेश आहे, तर छावणी विभागांतर्गत दौलताबाद रोडवरील अश्फाक ढाब्याजवळ सतत अपघात घडत असल्याने त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांनी घोषित केले.
औरंगाबाद शहरात अपघातांचे अनेक ‘ब्लॅक स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:19 IST