औरंगाबाद : समांतर जलवाहिनीकडे मागील दोन वर्षांपासून दुरुस्तीची छोटी-मोठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी मनपाला ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदांवर कंत्राटदारांनी बहिष्कार घातल्याने सुमारे ३ कोटी रुपयांची कामे प्रलंबित पडली आहेत. खाजगी कंपनीप्रमाणे दुरुस्तीसाठी दर देण्यात यावेत, अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे. कंत्राटदारांचे बंड मोडून काढण्यासाठी बाहेरून कंत्राटदार बोलावण्याचा विचार मनपा प्रशासनाने सुरू केला आहे.औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबत मनपाने केलेला करार दोन महिन्यांपूर्वी रद्द करण्यात आला. करार रद्द केल्यापासून कंपनीने शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीचे काम बंद केले आहे. अनेक वसाहतींमध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रत्येक झोननिहाय २५ लाख रुपयांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढल्या. या निविदा भरण्यास कंत्राटदार अजिबात तयार नाहीत. चार वेळेस निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. कंत्राटदार निविदांना प्रतिसाद देत नसल्याने मनपा प्रशासन संकटात सापडले आहे.कंपनीप्रमाणे दुरुस्तीचे दर द्यावेत, अशी मागणी कंत्राटदारांनी मनपाकडे केली आहे. एका खाजगी कंपनीप्रमाणे मनपा दरसूची लागू करू शकत नाही. शासकीय दरानुसारच आजपर्यंत कामे करण्यात आली आहेत, असे मनपाचे म्हणणे आहे. कंत्राटदारांचा बंड मोडून काढण्यासाठी दुसऱ्या शहरातील पाणीपुरवठ्याचे कंत्राटदार बोलावून कामे करून घेण्याचा विचार प्रशासन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कंत्राटदारांकडून मनपाला ब्लॅकमेलिंग
By admin | Updated: October 17, 2016 01:17 IST