जालना : जालना एनआयसीच्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्याच्या वेबसाईटमध्ये अमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शासनाच्या विविध कार्यालयांची या वेबसाईटवर माहिती असणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर नागरिकांना भरपूर माहिती मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी येथे केले.लोकशाही दिनानंतर जिल्ह्यातील विविध कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत नायक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी इतवारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रमेश कायंदे, डॉ. भारत कदम, माचेवाड, औताडे, रविंद्र जगताप, एन. बी. वीर, संगिता मकरंद, गंजेवार, वृषाली सोने, दीपक तुपेकर, पडूळकर आदी उपस्थित होते.जिल्ह्याची परिपूर्ण स्वरुपात वेबसाईट करण्यात येणार आहे. या वेबसाईटसाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांची संख्या, कार्यालय प्रमुखांचे नाव, राबविण्यात येणाऱ्या योजना, केलेली नाविण्यपूर्ण कामे, कामकाजाबाबतच्या मार्गदर्शक बाबी, आपल्या विभागाच्या वेबसाईटची लिंक आदी बाबींची माहिती सादर करावी, असे आवाहनही नायक यांनी यावेळी केले. या वेबसाईटसाठी माहिती मराठीतून देताना प्रामुख्याने युनिकोडमध्ये असावी, तसेच इंग्रजी भाषेतूनही त्या माहितीची एक प्रत सोबत द्यावी, असे सांगून नायक म्हणाले की, प्रत्येक कार्यालयात एका संगणक तज्ज्ञाची नोडल कर्मचारी-अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, त्या सर्व नोडल अधिकाऱ्यांना संगणक विषय विविध प्रकारचे आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच काही कार्यालयांना आवश्यक असलेले संंगणक सॉफ्टवेअरही तयार करुन देण्याचा मानसही आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अद्ययावत वेबसाईटमुळे परिपूर्ण माहिती मिळण्यास मोठी मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)
वेबसाईटमध्ये अमूलाग्र बदल करणार
By admin | Updated: August 6, 2014 02:15 IST