लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विमान बनविणे हे माझे पूर्वी स्वप्न होते, पण आता ते जगणे बनले आहे. मागील सहा-सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नुकतेच स्वदेशी बनावटीच्या सहा आसनी विमानाची नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने नोंदणी केली आहे. येत्या दोन महिन्यांत या विमानाची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती कॅप्टन अमोल यादव यांनी दिली.प्रसंग होता गुरुकुल आॅलिम्पियाड स्कूलच्या पहिल्या स्नेहसंमेलनातील. ‘इट इज नॉट जस्ट अस्कूल, बट ए करिअर स्कूल’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या गुरुकुलच्या स्नेहसंमेलनात याची झलक सर्वांना पाहण्यास मिळाली. मनोरंजनासोबत करिअर कसे घडवायचे याचेही ज्ञान देणारा सोहळा सर्वांनी अनुभवला. या सोहळ्यात देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे विमान बनविलेले कॅप्टन अमोल यादव सर्वांचे आकर्षण ठरले. त्यांची प्रकट मुलाखत शाळेचे अध्यक्ष प्रा. सतीश तांबट यांनी घेतली. यादव म्हणाले की, गच्चीवर पहिले सहा आसनी विमान तयार केले. यास माझ्या घरच्यांचा, नातेवाईकांचा मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, विमानाला परवानगी लालफितशाहीत अडकून पडली. मात्र, निराश न होता, मी माझे कार्य चालूच ठेवले. अखेर माझ्या प्रयत्नांना यश आले. मेक इन इंडियाच्या प्रदर्शनात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी माझे विमान पाहिले व तेथून पुढे कामाला गती मिळाली. यादव पुढे म्हणाले की, विमान बनविण्यासाठी सरकारने मला जमीन देण्याचे आश्वासन दिले आहे.जागा मिळेल तेव्हा मिळेल मात्र, मी त्यावर अवलंबून न राहता १९ आसनी विमान तयार होत आहे. शिवाय तिसरे विमानही बनविण्यासाठी हाती घेतले आहे. यादव यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ओळखा. आपल्याला काय आवडते हे जाणून त्यातच करिअर करा. विमान बनविण्याची भारतीयामध्ये क्षमता आहे. सरकारने त्यास सहकार्य केले तर देशात शेकडो अमोल स्वदेशी विमान बनविण्यासाठी पुढे येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी यादव यांच्या कार्याला सलाम केला. ही मुलाखत सर्वांमध्ये नवऊर्जा निर्माण करणारी ठरली.प्रारंभी, मुख्याध्यापक पंकज यादव यांनी शाळेची माहिती सांगितली. या सोहळ्याला डॉ. गणेश काळवणे, प्राचार्य डॉ.उल्हास शिऊरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.चिमुकल्यांनीमने जिंकलीगुरुकुल आॅलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली. प्रत्येक गीत-नृत्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. स्नेहसंमेलन पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. संग्रामनगर उड्डाणपुलावर उभे राहून अनेक जण या स्नेहसंमेलनाचा आनंद लुटत होते.
विमान बनविणेच जगणे बनले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:23 IST