परभणी: राज्यातील काँग्रेसच्या आघाडी सरकारने व केंद्रातील युपीए सरकारने त्यांच्या कालावधीत लोकहिताचे घेतलेले निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून समाजजागृती करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हरिकृष्ण यांनी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात बोलताना केले.अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने परभणी येथील नांदखेडा रोडवरील खाजगी सभागृहात निर्धार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिकृष्ण बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, जि.प. सदस्य मेघना बोर्डीकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, नगरसेवक डॉ.विवेक नावंदर, इरफान मलिक, लोकसभा अध्यक्ष नागसेन भेरजे, रवि पतंगे, नदीम इनामदार, लियाकत अली अन्सारी, इरफान उर रहेमान खान, बाळासाहेब रेंगे, गफ्फार मास्टर, नागसेन सोनपसारे, बंडू पाचलिंग, बाळासाहेब फुलारी, अगंद सोंगे, पेदापल्ली, डॉ.जेथलिया, विनय बांठिया, संतोष दिंडे, सतीश दामोदरे, अनिल गुट्टे, गणेश वाघमारे, इरफान आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना हरिकृष्ण यांनी मोदी सरकारने अच्छे दिन आने वाले है ची घोषणा फोल ठरल्याचे नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत निदर्शनास आले असल्याचे सांगितले. राज्यातील आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात तर गेल्या दहा वर्षात केंद्रातील युपीए सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवावेत. निश्चित विजय मिळेल. काँग्रेसने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा आघाडीचे सरकार येणार असून परभणीतही आघाडीचीच जागा निवडून येणार असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचा पंजा हाच उमेदवार समजून कामाला लागण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी परभणी विधानसभेत काँग्रेस सातत्याने का पराभूत होते, याचे मंथन करावे व आता युवक काँग्रेसला ही जागा सोडण्यात यावी, अशी मागणी केली. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वादामुळेच येथे आतापर्यंत पराभव झाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक युवक काँग्रेसचे परभणी विधानसभा अध्यक्ष गणेश देशमुख यांनी केले. (प्रतिनिधी)यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केले. ते म्हणाले की, पक्षाचे तिकीट मागवून आपण बेजार झालो आहोत. आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी वेटींगवर आहोत. वेटींगऐवजी आरएसी तर असू द्या, त्यातही आम्ही खूश राहणार आहोत, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. यावेळी त्यांनी १ बुथ दहा युथ ही संकल्पना युवक काँग्रेस, काँग्रेस व महिला काँग्रेस यांनी सक्षमपणे अंमलात आणावी, असे आवाहन केले. परभणीची जागा निवडून आणण्याची जबाबदारी युवक काँग्रेसने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीवर जोरदार टीकाया निर्धार मेळाव्यात डॉ.विवेक नावंदर, मेघना बोर्डीकर, सिद्धार्थ हत्तीअंबिरे या तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. जिल्ह्यात खरी लढाई राष्ट्रवादीसोबतच असल्याचे त्यांनी सांगितले. हत्तीअंबिरे यांनी तर काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावरच लढवावी, असे सांगून जिंतूरमध्ये पुन्हा एकदा आ.रामप्रसाद बोर्डीकरच विजयी होणार असल्याचे भाकित केले.
लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहचवा
By admin | Updated: September 19, 2014 00:12 IST