उस्मानाबाद : ‘भारत माता की जय... मेजर सासणे तुम आगे बढोऽऽ’ या गगणभेदी घोषणांच्या गजरात मेजर सुभाष सासणे यांनी उस्मानाबादच्या मातीत एक-दोन नव्हे तब्बल चार विश्वविक्रमांची नोंद केली. विश्वविक्रमाचा हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी आलेल्या प्रत्येकांच्या नजरा केवळ आणि केवळ सासणे यांच्या कामगिरीकडे लागल्या होत्या़ एका मिनिटांच्या क्रीडा प्रकारात सासणे यांनी केलेली कामगिरी हीच दिवसभर उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली होती़जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे यांनी विश्वविक्रमाचे प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर शहरासह जिल्हावासीयांचे लक्ष सोमवारकडे लागले होते़ वयाची ४८ वर्षे ओलांडलेले सासणे हे विश्वविक्रम रचणार यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच खेळाडूंची पावले श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलाकडे वळत होती़ साधारणत: सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरीक्षक पंचांसह तीन प्रशासकीय कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणात मेजर सुभाष सासणे यांनी विश्वविक्रमी कामगिरी सुरू केली़सासणे यांचे जिल्हा क्रीडा संकुलावर आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट आणि गगणभेदी घोषणांनी स्वागत करण्यात आले़ सासणे यांनी यापूर्वी लातूर येथे २४ तास स्टेप अप्सचा विक्रम केला आहे़ त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे प्रत्येकांच्या नजरा लागल्या होत्या़ प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या़ त्यानंतर सासणे यांनी प्रथमत: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एका मिनिटात ५२ स्टेपअप्स मारण्याचा विक्रम मोडीत काढला़ सासणे यांनी पाठीवर ४० पौंड वजन घेवून ५८ स्टेपअप्स मारले़ पहिल्याच प्रयत्नात सासणे यांनी विश्वविक्रम रचल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता़ काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर सासणे यांनी पाठीवर ८० पैंड वजन घेवून ४२ पुशअप्स मारत ब्रिटनच्या पैडी डोएल याच्या नावे असलेला विश्वविक्रम मोडला़ त्यानंतर पुश अप्स आॅन मेडिसीन बॉल क्रीडा प्रकारात सासणे यांनी जर्मनीच्या ग्रेगर श्रेगलचा एका मिनिटात ४७ पुश अप्स मारण्याचा विक्रम मोडत ५५ पुशअप्स मारत विश्वविक्रमांची हॅटट्रीक रचली़ त्यानंतर चौथा क्रीडा प्रकार हा त्यांनी स्वत: विकसित केलेला होता़ पुश अप्स वुईथ क्लॅप्स् या क्रीडा प्रकारात त्यांना एका मिनिटात २५ पुशअप्स काढण्याचे टार्गेट देण्यात आले होते़ उस्मानाबादच्या मातीत जगातील पहिला आणि सासणे यांचा चौथा विश्वविक्रम रचण्यासाठी ते मॅटवर उभा राहताच उपस्थितांनी एकच घोषणा देत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना शुभेच्छा दिल्या़ पूर्णत: शरीर थकलेले असतानाही सासणे यांनी ४५ पुशअप्स काढून नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली़ हा विक्रम होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला़ या विश्व विक्रमाचे मुख्य पंच म्हणून कोल्हापूर येथील जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय पंच अजित पाटील यांनी काम पाहिले़ तर बेंबळी येथील सरस्वती हायस्कूलचे अॅथलेटीक्स कोच मोहन पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयातील गणेश पवार, सत्यन जाधव, रूईभर येथील राजाभाऊ शिंदे, प्रशांत घाडगे यांनी टाईम किपर, मेजरमेंट इक्युमेंट सेटअप म्हणून काम पाहिले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, रवींद्र केसकर यांनी केले़ चार विश्व विक्रमानंतर सासणे यांचा उपस्थितांनी सत्कार केला़ (प्रतिनिधी)४सासणे यांनी रचलेल्या चारही विश्वविक्रमाचे तीन प्रशासकीय कॅमेऱ्यांमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे़ या कॅमेऱ्यातील फुटेजची सीडी बनवून ती लंडन येथील गिनीज बुक रेकॉर्ड कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे़ तेथे व्हिडिओची पाहणी करून अधिकृतरित्या विश्वविक्रमावर शिक्का मोर्तब्ब करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ चारही विश्वविक्रम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असून, गिनीज बुक रेकॉर्ड कार्यालयाकडील अधिकृत शिक्कामोर्तबकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़
मेजर सासणे तुम आगे बढोऽऽ
By admin | Updated: December 2, 2014 00:48 IST