सोयगाव : आगामी काळात होऊ घातलेल्या तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या सरपंचपदाची सोडत आठ डिसेंबरला होऊ घातली आहे. चाळीसपैकी तब्बल वीस गावांचा कारभार महिलांच्या हाती जाणार असून, सर्वसाधारण आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी चिठ्ठ्या टाकून सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम ग्रामीण भागात वाजू लागले आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम फेब्रुवारी अखेरीस जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यासाठी आठ डिसेंबरला सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन प्रवर्ग वगळता उर्वरित सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात येणार असून, यामध्ये वीस महिला सरपंचपदी विराजमान होणार असल्याने वीस गावांचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक पुरुष उमेदवारांना आता महिलांना पुढे करावे लागणार आहे.
सरपंचपदाच्या सोडतीची सोयगावला पूर्वतयारी
बचत भुवन सभागृहाच्या आवारात आठ डिसेंबरला सरपंचपदाची सोडत उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार असून तहसीलदार प्रवीण पांडे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, मकसूद शेख यांनी बैठकीचे नियोजन केले आहे.