ब्ाीड : वीज जोडणी करण्यास विलंब केल्याच्या कारणावरुन महावितरणच्या सहायक अभियंत्यास कार्यालयात घुसून एकाने मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता बार्शी नाका येथील उपकेंद्रात घडली.सोमनाथ घुले असे माहराण झालेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. ते बार्शी नाका येथे उपकेंद्रात कार्यरत आहेत. याच भागातील रुपेश गायकवाड याने जानेवारी महिन्यात वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यास ‘थ्रीफेज’ जोडणी हवी होती. सहायक अभियंता घुले यांना ही जोडणी करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांनी १७ जानेवारी २०१७ रोजी महावितरणच्या बीड येथील विभागीय कार्यालयास प्रस्ताव सादर केला होता; परंतु अद्यापपर्यंत गायकवाड यांच्या घरी वीज जोडणी करण्यात आलेली नाही. दरम्यान, सोमवारी दुपारी रुपेश गायकवाड बार्शी नाका येथील कार्यालयात पोहोचला. घुले हे आपले काम करत असताना त्याने ‘तुम्ही माझी वीज जोडणी का करत नाही?’ असा सवाल करुन त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरु केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर घुले यांना त्याने मारहाणही केली. कर्मचाऱ्यांनी घुले यांची सुटका करुन पोलिसांना कळविले. त्यानंतर पेठ बीड पोलिसांनी रुपेश गायकवाडला ताब्यात घेतले. घुले यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गायकवाडविरुद्ध मारहाण, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. घुले यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन सर्व जण अधीक्षक जी. श्रीधर यांच्या भेटीला गेले. त्यांना निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या रुपेश गायकवाडवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. (प्रतिनिधी)
महावितरण अभियंत्यास बीडमध्ये बेदम मारहाण
By admin | Updated: April 3, 2017 22:29 IST