औरंगाबाद : यंदाच्या गणेशोत्सवात महादबंग ढोल व सिंघम ढोलच्या आवाजाने शहर दणाणणार आहे. एकसाथ २५० महादबंग ढोल वाजविण्याचा विक्रम एक ढोलपथक करणार आहे. एवढेच नव्हे तर सर्वात मोठा सिंघम ढोलही या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. या ढोलच्या सोबतीला गंगाजमुना ताशा आहेच. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या ढोल पथकांची प्रॅक्टिस जोर धरत आहे. दुसरीकडे ढोल तयार करणाऱ्यांना सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. ढोलपथक नवीन ढोल खरेदी करत आहेत, तसेच जुन्या ढोलला दुरुस्तीसाठी आणले जात आहे. एका-एका ढोलपथकात १०० पेक्षा अधिक ढोल-ताशा वाजविणारे तयार झाले आहेत. काही जम्बो ढोलपथक आहेत, जिथे २५० ढोल-ताशे वाजविणार आहेत. पैठणगेट येथील ढोल विक्रेते शेख हसीम यांनी सांगितले की, जुलैपासूनच नवीन ढोलच्या विक्रीला सुरुवात झाली. तसेच जुन्या ढोलला गरवारे फिल्म बसविणे, दोरी, बोल्ट लावण्याचे कामही मोठ्या प्रमाणात येत आहे. कारण, शहरात ढोल-ताशा पथकांची संख्या वाढली आहे. तर नामांकित ढोल पथकाने आपल्याकडील ढोल-ताशाची संख्या वाढविली आहे. ढोल जरी अनेक आकारात मिळत असले तरीही ताशे मात्र एकाच आकारातील मिळतात. त्यात वर्षानुवर्षे ‘गंगा जमुना’ या नावाचे ताशे विक्री होतात. पूर्वी पत्र्यांचे ताशे येत; पण आता स्टीलचे ताशे विक्रीसाठी येत आहेत. पत्र्यापेक्षा स्टीलच्या ताशाचा आवाज जास्त घुमतो. यात ८ चावी, १० चावी, १२ चावी व १४ चावी असे नटबोल्ट असलेले ताशे विकले जातात. साधारणत: साडेतीन हजार ते ५ हजार रुपयांदरम्यान ताशे विकत मिळतात. लेडीज ढोल ४ढोलपथकात आता युवकांच्या बरोबरीने युवतीही सहभागी होऊ लागल्या आहेत. जम्बो ढोलचे वजन सर्वच युवतींना पेलवू शकत नाही. युवतींसाठी खास दीड ते दोन किलो वजनाचे ढोल तयार करण्यात आले आहेत. या ढोलला ‘लेडीज ढोल’ म्हणूनच ओळखले जात आहे. या ढोलचा आकार २४ इंची असतो. अनेक पथक जम्बो ढोल व लेडीज ढोल समप्रमाणात खरेदी करीत आहेत. साधारणत: बहुतांश ढोल-पथकामध्ये २२ इंची व ३० इंची ढोल असतात. त्यास जम्बो ढोल म्हणतात. यांचे वजन साधारणत: ३ किलोपर्यंत असते. यामुळे हे ढोल हाताळण्यास सोपे जातात. ४मात्र यंदा आम्ही ४० इंची महादबंग ढोल बनविला आहे. त्याचे वजन २० ते २२ किलोदरम्यान आहे. या महादबंग ढोलचे वैशिष्ट्य म्हणजे २० जम्बो ढोलचा आवाज या एकाच महादबंग ढोलमधून निघू शकतो. रणसंग्राम क्रीडा मंडळाने २५० महादबंग ढोलची आॅर्डर दिली आहे. ४महादबंगपेक्षाही मोठा सिंघम ढोल तयार करण्यात आला आहे. ५७ इंचीचा हा ढोल सर्वात मोठा ढोल म्हणून ओळखला जातो. सिंघम ढोलचे वजन ३० ते ३५ किलोदरम्यान असल्याने स्टँडवर ठेवूनच हा ढोल वाजविला जाऊ शकतो. महादबंग व सिंघम ढोल गणेशोत्सवातील ढोलपथकाची वैशिष्ट्ये ठरणार आहेत.
गणेशोत्सवात दणाणणार महादबंग, सिंघम ढोल
By admin | Updated: September 8, 2015 00:35 IST