गेवराई : विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी तब्बल ४० हजारांची लाच मागून २० हजार रुपये स्वीकारताना गुरुवारी दुपारी महावितरणचा कनिष्ठ तंत्रज्ञ दीपक अंकुश पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथील जुन्या बसस्थानकाजवळ रंगेहाथ पकडले. त्याचा पंटरही सापळ्यात अडकला आहे.अंतरवली येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते. रोहित्र बसविण्यासाठी शेतकरी तलवाडा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात चकरा मारत होता. कनिष्ठ तंत्रज्ञ पवार याने शेतकऱ्याला ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी गुरुवारी २० हजार रुपये देण्याचे ठरले. गेवराई येथील जुन्या बसस्थानकाजवळील हॉटेलात दुपारी लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. गेवराई ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईने महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उपअधीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, पो.कॉ. बालासाहेब केदार, श्रीराम खटावकर, विकास मुंडे, प्रदीप वीर, सय्यद नदीम यांचा कारवाईत सहभाग होता. (वार्ताहर)
महावितरण तंत्रज्ञाला ‘एसीबी’चा झटका !
By admin | Updated: November 4, 2016 00:09 IST