औरंगाबाद : ऐतिहासिक आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल तलावावर काही भूखंड माफियांची वक्रदृष्टी पडली असून, मागील काही महिन्यांपासून तलावात भरती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वक्फ बोर्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रेकॉर्डवर कमल तलावाच्या नावावर जेवढी जमीन आहे, त्यातील अर्ध्या जागेवर अगोदरच अतिक्रमणे झाली आहेत. उर्वरित जागाही बळकावण्याचे काम सध्या सुरू आहे. कमल तलावाच्या बाजूला आरोग्य विभागाचे टी. बी. हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलला लागून कमल तलावाची तीन ते चार एकर जागा आहे. पावसाळ्यात तलावात थोड्या फार प्रमाणात पाणी साचते. तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असल्याने पूर्वीप्रमाणे पाणीही थांबत नाही. फार वर्षांपूर्वी तलावात फक्त कमळाचीच फुले दिसून येत असत. त्यामुळे या तलावाचे नाव कमल तलाव असे पडले होते. तलावाच्या समोरून ८० फूट रुंद रस्ता आरेफ हाऊसिंग सोसायटीकडे जातो. या रस्त्यावर २४ तास वाहनधारकांची आणि पादचार्यांची वर्दळ असते. मात्र, मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला कमल तलावाच्या बाजूने मातीची भरती आणून टाकण्यात येत आहे. ही भरती कधी आणि कोण टाकतो हे परिसरातील नागरिकांनाही माहीत नाही. या भरतीमुळे ऐतिहासिक तलावाचे अस्तित्वच नष्ट होत आहे. अलीकडे कमल तलावाच्या जागेवर हज हाऊस बांधण्यात यावे, असाही प्रस्ताव समोर आला होता. ही जागा कमी पडेल म्हणून हज हाऊसचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने हज हाऊससाठी किलेअर्क येथे जागा दिली. कमल तलावाची मनपाने डागडुजी करावी, अशी मागणी आरेफ हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अय्युब खान यांनी केली आहे. मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तलाव काही दिवसांमध्ये गायब होईल. भूखंड माफिया भरती टाकून प्लॉटिंग करून मोकळे होतील. तलावाच्या बाजूला मनपाचे उद्यान गेले तळीरामांच्या ताब्यात; रात्री भरते मैफल मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेने या तलावाची साफसफाई केली नाही. त्यामुळे तलावात दुर्गंधी पसरलेली असते. अतिक्रमणामुळे तलावातील पाण्याला वाहण्यासाठी नैसर्गिक प्रवाहच नाही. महापालिकेने तलावाच्या बाजूला एक उद्यान उभारले आहे. या उद्यानात एकही नागरिक पाय ठेवत नाही. दिवसा आणि रात्री उद्यान तळीरामांच्या ताब्यात असते. लाखो रुपये खर्च करून मनपाने हे उद्यान कशासाठी बांधले, असा प्रश्न नागरिकांना पडतो.
तलावावर माफियांचा डोळा
By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST