लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली. लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात त्यांनीच मांडली, असे मत माजी खा.डॉ. जनार्दन वाघमारे यांनी येथे व्यक्त केले. कस्तुराई मंगल कार्यालयात सातव्या मराठी शरण साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ‘मानवतावादी बसवेश्वर आणि इतर राष्ट्रीय संत’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रा. भीमराव पाटील, डॉ. विशाल लिंगायत, डॉ. विजयकुमार करजकर यांचाही सहभाग होता. यावेळी डॉ. वाघमारे यांनी, भगवान बुद्ध, महावीर यांच्यासह बाराव्या शतकातील अनेक राष्ट्रीय संतांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. कार्याची पद्धती वेगवेगळी असली, तरी संतांचे विचार समाजजागृतीसाठी बहुमूल्य असल्याचे ते म्हणाले. महात्मा बसवेश्वरांचा काळ जाऊन हजारो वर्षे उलटली. मात्र त्यांचे विचार, वचने आजही प्रेरणा देण्याचे कार्य करतात. शब्द आणि विचारांचा आविष्कार म्हणजे साहित्य. ज्ञान असल्याशिवाय स्वयंप्रकाशित होता येत नाही, अशा आशयाचे विचार सर्वच तत्कालीन महापुरुषांनी मांडले आहेत. बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले असले तरी त्याकाळी सामान्यांना स्वातंत्र्य नव्हते. धर्म माहीत नव्हता. शरण साहित्य बहुजनांचे तर दलित साहित्यात नकार, निषेध, विद्रोह आढळून येतो. अशाच प्रकारचा विरोध शरण साहित्यातही आढळतो. आपल्या समाजात धर्माला विरोध नसतो. धर्माच्या नावावर होणाऱ्या वाईट गोष्टींना विरोध होत असतो. महात्मा बसवेश्वरांना मंदिर संकल्पना मान्य नव्हती. महावीर, बुद्धांनी ईश्वरच नाकारला, असेही डॉ. वाघमारे म्हणाले. समानतेची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली असल्याचे यावेळी प्रा. भीमराव पाटील, डॉ. करजकर, डॉ. विशाल लिंगायत म्हणाले. (प्रतिनिधी)
म. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लोकशाहीची संकल्पना मांडली
By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST