जाफराबाद : तालुक्यातील हिवराबळी येथील शेतकरी बाबूराव आसाराम लहाने यांच्या शेतातील गोठ्याला व टिनपत्र्याच्या शेडला मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास २ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारची वेळ आणि उन्हाची तीव्रता प्रचंड असल्यामुळे काही वेळातच मोठा भडका होऊन होत्याचे नव्हते झाले. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.हिवराबळी शिवार गट नंबर १३ मध्ये बाबुराव लहाने यांचे बाम्हणी नावाचे शेत असून, शेतामध्ये जनावरांसाठी तसेच शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी टिनपत्राचे शेड व गोठा आहे.यामध्ये नुकतेच रबी हंगामामध्ये घेण्यात आलले कांदा बियाणे, गहू याची मळणी करून ठेवण्यात आले होते. यामध्ये जवळपास कांदा बियाणे ५ पोते, गहू १५ क्विंटल, पीव्हीसी पाईप ५० नगर, केबल, ताडपत्र्या, स्पिंकलर सेट सोबत शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य जळून गेले आहे.घटनेचा पंचनामा तलाठी काळे यांनी केला असून, झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने कली आहे.यावेळी घटनास्थळी तलाठी काटे, आत्माराम लहाने, विलास लोखंडे, भास्कर लहाने, शिवाजी भोपळे व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
गोठ्याला आग लागून २ लाखांचे नुकसान
By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST