औरंगाबाद : जायकवाडी धरण मृतसाठ्यात असूनही वरच्या भागातील पाण्याची पळवापळवी सुरूच आहे. पालखेड आणि नांदूर -मधमेश्वरनंतर आता ओझर बंधाऱ्याचेही कालवे सुरू करण्यात आले आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी खरीप पिकांना पाणी देण्यात येत आहे. यंदा जुलैपासूनच वरच्या भागात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले जात आहे. सद्य:स्थितीत जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. दुसरीकडे वरच्या धरणांमध्ये ५२ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तरीही खाली पाणी सोडण्याऐवजी कालव्यांद्वारे ते इतरत्र वळविले जात आहे. २० दिवसांपूर्वी पालखेड आणि नांदूर-मधमेश्वर धरणाचे कालवे सुरू करण्यात आले होते. पालखेड धरणाचे कालवे दहा दिवसांनंतर बंद झाले. नांदूर मधमेश्वर धरणाचे दोन्ही कालवे अजूनही सुरूच आहेत. आता पुन्हा ओझर बंधाऱ्याच्या कालव्यामधूनही शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. दोन दिवसांपासून या बंधाऱ्याच्या दोन्ही कालव्यांतून विसर्ग करण्यात येत आहे. सध्या या बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यातून शंभर आणि उजव्या कालव्यातून ७३० क्युसेक्स वेगाने पाणी सोडणे सुरू आहे, तर नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या कालव्यातून १०० आणि उजव्या कालव्यातून दीडशे क्युसेक्स विसर्ग होत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी याप्रकरणी अजूनही गप्पच आहेत. हे कालवे बंद करण्यासंदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप संबंधितांना सूचना दिलेल्या नाहीत. पावसाळ्यातच पाणी सोडाऔरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात कालव्यांद्वारे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले जात असल्याच्या विरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जलसंपदा खात्याने वरच्या धरणांचे सर्व कालवे तातडीने बंद करावेत तसेच जायकवाडी धरणात उन्हाळ्यात पाणी सोडण्याऐवजी आता पावसाळ्यातच वेळोवेळी योग्य प्रमाणात पाणी सोडावे, अशी मागणी या आमदारांनी केली आहे. याच मागणीसाठी मराठवाड्यातील आमदार सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. तर काही आमदारांनी सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.गोदावरी खोऱ्यात नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदाही मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. समाधानकारक पावसामुळे जायकवाडीवरील जवळपास सर्वच प्रकल्प निम्म्यापेक्षा जास्त भरले आहेत. पण तरीदेखील खाली पाणी येऊ देण्याऐवजी कालव्यांद्वारे पाणी सोडून भरलेले प्रकल्प रिकामे करण्यात येत आहेत. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हक्काचे पाणी पळविलेले सहन केले जाणार नाही, असा इशाराही लोकप्रतिनिधींनी दिला आहे. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी आक्रमकवरच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास आमचा विरोध नाही. परंतु त्यासाठी मराठवाड्यावर अन्याय होता कामा नये. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे. आधी त्यात पाणी आले पाहिजे. पाऊस पडत असताना कालव्याने पाणी सोडणे चुकीचे आहे.- संजय शिरसाट, आमदारहक्काच्या पाणी प्रश्नावर परवाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटलो. दरवर्षी उन्हाळ्यात जायकवाडीत पाणी सोडले जाते, त्यातील निम्मेच पाणी खाली येते. यंदा आताच जायकवाडीत पाणी सोडावे तसेच सध्या वरच्या भागात सुरू असलेले कालवे तात्काळ बंद करावेत, अशी मागणी आम्ही केली आहे. - अतुल सावे, आमदारऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील एकूण पाण्यात जायकवाडीचा ४१ टक्के वाटा आहे. मराठवाड्याला हा वाटा वेळेवर मिळायला हवा. तसेच आतापर्यंत वरच्या भागात कालव्याद्वारे जे पाणी वापरले तेही हिशोबात धरावे. या मागण्यांसाठी आम्ही सोमवारीच जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कार्यालयात जाणार आहोत.- प्रशांत बंब, आमदारपावसाळ्यात शेतीसाठी पाणी सोडणे चुकीचे आहे. हे कालवे तातडीने बंद करावेत. सध्या वरच्या भागातील धरणांमध्ये मुबलक साठा झाला आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरण भरेपर्यंत वरच्या भागात आणखी पाणी अडविता कामा नये. जलसंपदा मंत्र्यांकडे ४ आॅगस्टच्या बैठकीत मी हा विषय मांडणार आहे.- संदीपान भुमरे, आमदारसमन्यायी वाटपाचे धोरण कोर्टानेही मान्य केलेले आहे. परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी नाही. परंतु आम्ही हा अन्याय खपवून घेणार नाही. वरच्या धरणांमध्ये पन्नास टक्के साठा झाला असेल तर खाली जायकवाडीत किमान ३० टक्के साठा होईपर्यंत आता वर पाणी अडविता कामा नये. - राजेश टोपे, आमदार यंदाही धाकदपटशा करून हक्काचे पाणी पळविले जात आहे. मात्र हे सहन केले जाणार नाही. या प्रश्नावर सर्व आमदार एकत्र नक्कीच येतील. - सतीश चव्हाण, आमदार पाणी प्रश्नावर आमदार जाणार प्राधिकरणातऊर्ध्व गोदावरी धरणांमधून आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मराठवाड्याच्या हिश्श्याचे पाणी सोडावे, या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदार सोमवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कार्यालयात जाणार आहेत. ४जुलै महिना संपला तरी मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वरच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यात येते. त्यातील निम्मे पाणीच खाली येते. म्हणून यंदा आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी जायकवाडीत सोडावे, कृष्णा-भीमा प्रकल्प आणि नांदूर-मधमेश्वर कालवा व इतर प्रकल्पांनाही याचप्रमाणे पाणी मिळावे, अशी मागणी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागातील सर्व आमदार सोमवारी दुपारी १ वाजता एकत्र येत असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी कळविले आहे.
हक्काच्या पाण्याची लूट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 01:32 IST