औरंगाबाद : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सहा-सहा महिन्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रवेशासाठी अडचण येण्याच्या चिंतेने विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे चकरा मारण्याची वेळ विद्यार्थी आणि पालकांवर येत आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक- १ औरंगाबाद विभागांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या चार जिल्ह्यांचे काम चालते. या चारही जिल्ह्यांतील शैक्षणिक, सेवा, निवडणूक व अन्य कारणांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करणे आणि त्यानंतर वैधता प्रमाणपत्र देणे हे काम चालते. नुकताच बारावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशाचे वेध लागले आहेत. प्रवेशासाठी जात पडताळणी आवश्यक असते. त्यामुळे आता प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे. दाखल केल्यानंतर सहा महिन्यांत प्रकरण निकाली निघाले पाहिजे; परंतु ते निघत नसल्याने अनेक विद्यार्थी आणि पालकांना चकरा मारण्याची वेळ येत आहे. अनेकांना तर तुमची फाईल गहाळ झाल्याचे सांगितले जाते. याविषयी व्यवस्थापक एच. आय. शेख म्हणाले, सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पडताळणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. त्रुटी काढण्यात आल्यामुळे विलंब होतो. प्रत्येक अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो.बीडवरून आलोमुलाच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी फेब्रुवारीमध्ये अर्ज केला आहे. अद्यापही बीडवरून याठिकाणी येण्याची वेळ येत आहे, असे राजेंद्र ढाकणे म्हणाले.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा
By admin | Updated: May 31, 2016 00:41 IST