पाथरी : प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत तब्बल सोळा शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे अखेर हादगाव बु़ येथील ग्रामस्थांनी २६ आॅगस्ट रोजी शाळेला सकाळी १० वाजता कुलूप ठोकले़ शिक्षकांनी या बाबत शिक्षण विभागाला माहिती देताच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट देऊन ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़पाथरी तालुक्यातील हादगाव बु़ येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे़ प्राथमिक शाळेत सात शिक्षकांची पदे मान्य असून, तीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत़ माध्यमिक शाळेत १७ पदे मान्य असताना १३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत़ या बाबत येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि नागरिकांनी शिक्षण विभागाला यापूर्वी तीन वेळा लेखी निवेदन दिले़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली़ परंतु, येथील शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जात नसल्याने शेवटी २६ आॅगस्ट रोजी शाळेला शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने कुलूप ठोकण्यात आले. हे आंदोलन करण्यापूर्वी ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थी घरी पाठवून दिले़ शिक्षण विभागाला या घटनेची खबर शाळेतील शिक्षकांनी देताच शिक्षण विस्तार अधिकारी फंड, शिक्षण विस्तार अधिकारी गोरे या दोन अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट दिली़ दोन दिवसांत रिक्त जागा भरण्याबाबतचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले़ या आंदोलनामध्ये दिलीप मोरे, बाबासाहेब नखाते, सुनील नखाते, अशोक कनके, नवनाथ नखाते, विजय भालेराव, आवडाजी ढवळे यांनी सहभाग घेतला़ (वार्ताहर)
ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप
By admin | Updated: September 1, 2014 00:26 IST