लातूर : तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला असताना दुय्यम निबंधक कार्यालय लातूर-१ व लातूर-२ च्या आवारात विनापरवाना बसून मुद्रांक विक्री व दस्त लेखनाचे काम एका अनधिकृत व्यक्तीकडून होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेते व दस्त लेखकांनी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडेधाव घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय लातूर-१ व लातूर-२ च्या कार्यालयात मुद्रांक विक्री व दस्त लेखनाचे काम परवानाधारकांकडून करण्यात येते. मात्र एका विक्रेत्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी संबंधित व्यक्तीचा परवाना निलंबित आहे. संबंधित विक्रेत्यांच्या वर्तणुकीत बदल व नागरिकांशी सलोख्याची वर्तणूक व्हावी म्हणून तीन महिन्यांसाठी त्या मुद्रांक विक्रेत्यास अनुज्ञेय असलेली कामे करता येणार नाहीत. तसेच सदर कालावधीत त्याचा अभिलेख त्याने कार्यालयात जमा करावयाचा आहे. असे आदेश असताना संबंधित विक्रेत्यांकडून दस्तलेखन व ई-चलन काढण्याचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे त्याला दस्त लिहिण्यास व ई-चलन काढण्यास मनाई करावी, अशी मागणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांनी केली आहे.निवेदनावर मुद्रांक विक्रेते एम.एस. मुळे, पी.टी. पवार, एस.ए. कवठाळकर, आर.ए. साळुंके, के.एस. शेख, एन.टी. खंडागळे, एल.एन. मुळे, एन.एल. हत्तरगे, एस.डी. पुरी, एस.बी. माने, आर.एस. वाघमारे, डी.पी. बनसोडे, बी.एम. चापोलीकर, अशोक गायकवाड, व्ही.एन. कांबळे आदींची नावे आहेत. (प्रतिनिधी)
परवाना निलंबित असताना दस्तलेखन !
By admin | Updated: October 11, 2016 00:35 IST