वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील बीट जमादार दांडेगाव परिसरातील अवैध गावठी दारु पकडण्यासाठी गेले असता, त्यांना दारू विक्रेत्यांनी मारहाण केल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यापूर्वी येडशीच्या यात्रेत पोलिसांनी मार खाल्ला होता, त्यामुळे या परिसरात खाकीचा धाकच नसल्याचे दिसून येत आहे. रामेश्वर तांडा येथील ग्रामस्थ अवैध दारू काढत असल्याची तक्रार आखाडा बाळापूर पोलिसांत काही दिवसांपूर्वी दिली होती. त्या अनुषंगाने रामेश्वर तांडा येथील पोलिस चौकीचे बीट जामादार संतोष श्रीराम नागरगोजे यांच्यासह एक पोलिस कर्मचारी दांडेगाव शिवारात अवैध दारु पकडण्यासाठी गेले होते. ते अवैध दारु काढण्याच्या ठिकाणी पोहोचले असता त्यांनी अवैध दारूविक्रीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणे सुरु केले. दरम्यान, ‘ तुम्ही आमचीच दारु का धरता’ असे म्हणून विक्रेते मंगेश ऊर्फ बाळू उत्तम राठोड व अतुल उत्तम राठोड या दोघांनी पोलिसांना दगड व लाथाबुक्यांनी जबर मारहाण करुन शिवीगाळ केली. पोलिसांनी पाचशे रुपयांची १० लिटर दारु जप्त केली. तर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरुन बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी दांडेगाव येथे पोहोचेपर्यंत आरोपी पसार झाले होते. (वार्ताहर)
दारू विक्रेत्याने जमादारास बदडले
By admin | Updated: January 12, 2016 23:43 IST