नांदेड : जिल्हा परिषदेच्या लिफ्टचे काम दोन वर्ष ओरड झाल्यानंतर सुरू करण्यात आले असून या कामाचा दर्जा मात्र जुन्या बाटलीत नवी दारू या उक्तीप्रमाणे होत आहे़जिल्हा परिषदेच्या लिफ्टचे काम १५ दिवसांपासून सुरू आहे़ हे काम करत असताना जुन्याच साहित्याचा वापर केला जात आहे़ प्रत्यक्षात ही लिफ्ट नवीन बसविण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागातून सांगण्यात आले़ यासाठी जवळपास ३५ लाख रूपये खर्चही केला जाणार आहे़ लिफ्ट निर्मितीचे काम लक्षात आल्यानंतर अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत विचारणा केली आहे़ लिफ्ट नवीन बसवली जात आहे की जुन्या लिफ्टची दुरूस्ती केली जात आहे? जि़प़ सदस्य मोहन पाटील टाकळीकर यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे या लिफ्टच्या कामासंदर्भात माहिती विचारली आहे़ तसेच जि़प़ सदस्य रमेश सरोदे, दिनकर दहिफळे यांनीही या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगितले़ यासंदर्भात बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता एस़एम़ तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही़ जिल्हा परिषदेत होत असलेल्या बहुतांश कामाबाबत साशंकता व्यक्त होत आहे़ ही कामे पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना दिले जात असून याबाबत सर्व नियमावलींचे उल्लंघन केले जात असल्याचेही स्पष्ट होत आहे़ (प्रतिनिधी)
लिफ्टचे काम, जुन्या बाटलीत नवी दारू़़!
By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST