बीड : मागील तीन दिवसांत जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सर्व नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नागरिक वाहून गेल्याच्या घटना घडल्या. मागील २४ तासांत सरासरी ४७.३ मि.मी., तर एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०७.४८ टक्के पावसाची नोंद झाली. धुवाधार पावसाने जिल्ह्यातील सरासरी आकडेवारी मागे टाकली आहे. आतापर्यंत झालेल्या पर्जन्यमानाची आकडेवारी (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) बीड- ६१.६ (६२६.४), पाटोदा- २७.३ (६८७.८), आष्टी- २५.३ (५१६.८), गेवराई- ४४.९ (६४१.८), शिरूर कासार- ३६.७ (५८६.३), वडवणी- ९०.० (९५८.३), अंबाजोगाई- ३८.० (७९९.६), माजलगाव- ७१.० (९४१.७), केज- ६७.३ (७५१.८), धारुर- १७.३ (६५८.६), तर परळी- ४१.४ (७०९.०) (प्रतिनिधी) माजलगाव धरणातून ८० हजार क्युसेक्सने सोडलेल्या पाण्यामुळे सिंदफणा नदीवरील पुलाला पाणी चिकटले होते. दरम्यान, संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारी सकाळी ११ वाजेपासून या पुलावरील वाहतूक बंद केली असल्याने माजलगाव-गढी मार्गावरील जड वाहनांची वाहतूक २५ कि.मी. अंतरापर्यंत ठप्प झाली होती. विशेष म्हणजे औरंगाबादकडून बीडकडे येणारी जड वाहने गढीहून माजलगावमार्गे वळविली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता सिंदफणा नदीवरील वाहतूक खुली करण्यात आली.
जनजीवन पूर्वपदावर
By admin | Updated: September 26, 2016 00:16 IST