परभणी : पत्नीस जाळून तिचा खून केल्याच्या प्रकरणात सेलू येथील पती व जावेस अतिरिक्त तदर्थ सत्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ३० आॅगस्ट रोजी हा निकाल दिला.सहसरकारी वकील ए. के. दुर्राणी यांनी या प्रकरणाची दिलेली माहिती अशी- २५ सप्टेंबर २०१२ रोजी शीतल अर्जुन राऊत हिने पोलिसांसमोर तसेच नायब तहसीलदार कोलगणे यांच्या समक्ष असा जबाब दिला होता की, तिचे लग्न अर्जुन अंजीराम राऊत याच्यासोबत झाले होते. अर्जुन हा सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील मूळ राहणारा असून सध्या सेलू येथे देवला पुनर्वसन कॉलनीत राहत होता. शीतल हिच्या लग्नानंतर पती अर्जून राऊत, सासरा अंजीराम राऊत, सासू रुख्मिणबाई, भाया वसंतराव राऊत, दत्ता राऊत, भागवत राऊत, जावा जनाबाई, रेखा व शिवकन्या राऊत यांनी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केली. घटनेच्या आधी धोंडे जेवण केले नाही म्हणून २४ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जाऊ जनाबाई राऊत हिने शीतलच्या अंगावर रॉकेल टाकले व पती अर्जुन याने काडी लावून पेटवून दिले. त्यामुळे ती १०० टक्के जळाली होती. २५ सप्टेंबर रोजीच सकाळी तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबाबावरुन सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.पी. राठोड यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे सहसरकारी वकील ए.के. दुर्राणी यांनी ९ साक्षी नोंदविल्या. सर्व साक्षीदारांचे बयान महत्त्वपूर्ण ठरले. वरील सर्व आरोपींनी शीतल हिला पैशाची मागणी करुन त्रास दिला व आरोपी अर्जून आणि जनाबाई या दोघांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून दिले, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला. परंतु, न्यायालयाने सात आरोपींना निर्दोष ठरवित आरोपी अर्जून व जनाबाई राऊत यांना कलम ३०२ नुसार जन्मठेप व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ए.के. दुर्राणी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
पतीसह जावेला जन्मठेप
By admin | Updated: September 1, 2014 00:27 IST