बीड : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकरास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्वंस यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा मंगळवारी सुनावली. अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी येथील नारायण कामाजी जमदाडे हे बीड शहरातील पेठबीड भागातील ढगे कॉलनी येथे वास्तव्यास होते. त्यांची पत्नी हिंदुबाई नारायण जमदाडे हिचे शेख अली शेख बाबू (रा. मोमीनपुरा) याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. ही बाब नारायण यांना समजल्यानंतर त्यांनी याचा विरोध केला होता. या कारणावरून नारायण व हिंदुबाई यांच्यात भांडणे व्हायची. १४ मे २०१२ रोजी या दोघांचे पुन्हा याच गोष्टीवरून भांडण झाले. त्यामुळे नारायणने दारू पिवून हिंदुबाई हिला मारहाण केली. याची माहिती तिचा प्रियकर शेख अली शेख बाबू याला समजली. त्यामुळे हिंदुबाई व शेख अली यांनी नारायण यास मारहाण केली. दोघांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केल्यानंतर कोयत्याने एक कान कापला. या प्रकारानंतर नारायण याचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत त्या दोघांनी बिंदुसरा नदीपात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शेख अली शेख बाबू व हिंदुबाई जमदाडे यांच्या विरूद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्या. विद्वंस यांच्यासमोर हे प्रकरण चालले. सदरील प्रकरणात जिल्हा सरकारी वकील मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले . त्यानंतर या प्रकरणा सहायक सरकारी वकील नामदेव साबळे यांनी शेवटच्या दिवशी युक्तीवाद केला. पुरावा ग्राह्य धरत हिंदुबाई व शेख अली शेख बाबू यांना जन्मठेप सुनावण्यात आली.(प्रतिनिधी)
पतीच्या हत्ये प्रकरणी जन्मठेप
By admin | Updated: May 6, 2015 00:30 IST