औरंगाबाद : गणपतीपुढे पत्ते का खेळू देत नाही, या कारणावरून लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून दुर्गेश दामोदर धनेधर (२०, रा. विजयनगर, गारखेडा ) यांचा खून करणाऱ्या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी सक्त कारावासासह जन्मठेपेची व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मंगेश दामोदर धनेधर २१, रा. विजयनगर, गारखेडा यांनी तक्रार दिली की, २७ आॅगस्ट २००९ रोजी रात्री फिर्यादी व मयत घरासमोर बसले असता आरोपी शेख जावेद शेख लाल (१९), शेख असद शेख लाल (२२ ) शेख लाल शेख मोहम्मद (४८) व शेख इसार शेख लाल (२५) हे जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला व फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ केली. यात गणपतीसमोर पत्ते का खेळू देत नाही, गणपती बसविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे म्हणत फिर्यादी मंगेश, दुर्गेश व मयताचा मावसभाऊ योगेश यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. दुर्गेशच्या डोक्यात मारहाण केल्याने कॉलनीतील नागरिकांनी तिघांनाही घाटी रुग्णालयात दाखल केले. दुर्गेशची तब्येत जास्त खराब असल्याने त्यास खाजगी रुग्णालयात दाखल केले. यात ३१ आॅगस्ट रोजी दुर्गेशचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात मुकुंदवाडी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींना ३० आॅगस्ट रोजी अटक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बी. पी. राठोड व सहायक निरीक्षक पंढरीनाथ पवार यांनी तपास केला. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता प्रत्यक्षदर्शी मंगेश धनेधर आणि योगेश गायकवाड , आनंद धनेधर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यातील आरोपी क्र.१ शेख जावेद शेख लाल आणि शेख असद शेख लाल यांना कलम ३०२ नुसार सक्त कारावासासह जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड, तर कलम ३२६ नुसार ३ वर्षे शिक्षा व एक हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ महिन्याची साधी कैद देण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सरकारी वकील बी. आर. लोया यांनी काम पाहिले.
खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेप
By admin | Updated: November 8, 2016 01:21 IST