लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शस्त्राचे वार करुन खून केल्या प्रकरणी आरोपी मुजाहिद मुखीद कुरेशी यास परभणीच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणाची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, ३१ जुलै २०१५ रोजी आरोपी मुजाहिद मुखीद कुरेशी याने किशन विश्वनाथ रोडे याला चोरी करण्यासाठी का येत नाहीस, या कारणावरुन शस्त्राने मारुन जखमी झाले. उपचार सुरु असताना किशन रोडे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी किशन याचे वडील विश्वनाथ पंढरीनाथ रोडे यांच्या फिर्यादीवरुन पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी मुजाहिद मुखीद कुरेशी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनी केला. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार नसतानादेखील पुरावे गोळा करुन व इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एम.सादराणी यांच्या न्यायालयासमोर झाली. साक्षी पुराव्याअंती जिल्हा सत्र न्यायाधीश सदराणी यांनी आरोपी मुजाहिद मुखीद कुरेशी यास जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील डी.बी.कुटे, निलिमा कोकड यांनी सरकारपक्षाची बाजू मांडली.
खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 23:51 IST