जालना : घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री येथील आरोपी सुरेश रामभाऊ साबळे याने शेती बटाईने देण्याच्या कारणावरून वडिलांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने आणि काठीने वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश २ व्ही.एम. देशपांडे यांनी कलम ३०२ मध्ये आरोपीस जन्मठेपेची शिक्षेसह १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. कलम २०१ मध्ये तीन वर्षे शिक्षेसह ३ हजार रुपये दंड आणि कलम ३२३ मध्ये एक वर्षाची शिक्षा सुनावली.घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री येथील आरोपी सुरेश रामभाऊ साबळे याने शेती बटाईने देण्याच्या कारणावरून वडिलांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने आणि काठी, विटकराने मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला होता. संजय छबुराव हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात तपासिक अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक के.जी. पवार यांनी सुरूवातीला काम पाहिले. नंतर सहायक पोलिस निरीक्षक पी.यु. बांगर यांनी उर्वरित तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सदरच्या खटल्यात एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी घटनेचा साक्षीदार फिर्यादी आणि डॉ. आशीष राठोड यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जयश्री बापूसाहेब सोळंके (बोराडे) यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी टीममधील कोर्ट ड्युटी कॉन्स्टेबल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. (प्रतिनिधी)
खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:26 IST