औरंगाबाद : मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न लवकर सुटण्याच्या दृष्टीने पूर्वीप्रमाणे दरवर्षी औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक होणे आवश्यक आहे. त्यामुळे काही वर्षांपासून बंद झालेली ही बैठक पुन्हा सुरू करावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, असे ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. विभागस्तरावरील वार्षिक नियोजनाच्या बैठकीसाठी आल्या असताना त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थितीआहे. परंतु मराठवाड्यात त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे वार्षिक नियोजनात मराठवाड्याला जास्तीचा निधी मिळाला पाहिजे. पालकमंत्री या नात्याने आम्ही अर्थमंत्र्यांकडे तशी मागणी करणार आहोत. मराठवाड्याचा इतर क्षेत्रातील अनुशेषही भरपूर आहे. विभागाचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न अधिक तत्परतेने सुटण्यासाठी मराठवाड्यात दरवर्षी मंत्रिमंडळाची बैठक होणे फायदेशीर आहे. परंतु काही वर्षांपासून ही बैठक होणे बंद झाले आहे. त्यामुळे ही बैठक पुन्हा सुरू करावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असेही पालवे यांनीसांगितले. दुष्काळ निर्मूलनाच्या हेतूने राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या.
मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रयत्न करू
By admin | Updated: February 14, 2015 00:12 IST