येडशी : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील अंगणवाडीला (क्र.२३) घूस लागली आहे. घुशीने उकिर काढल्यामुळे अख्ख्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात माती साठली आहे. त्यामुळे चिमुकल्यांना या उकिरावर बसूनच ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. अंगणवाडी सुपरवाजर यांनी ही धोकादायक बाब वरिष्ठांना कळविली आहे. परंतु, याबाबत कुठल्याही स्वरूपाचा तोडगा निघालेला नाही. चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकारीच गंभीर नसल्याने अंगणवाडीला टाळे ठोकण्याची भूमिका पालकांतून बोलून दाखविली जात आहे.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. येथून चिमुकल्यांना पोषण आहारासोबतच ज्ञानाचे धडेही दिले जातात. परंतु, उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील अंगणवाडीतील (क्र.२३) चित्र पाहिल्यानंतर चिमुकले अंगणवाडीत बसतात कसे? अन् पोषण आहार खातात कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहाणार नाही. शाळा तसेच अंगणवाड्यांनी मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती पाऊले उचलावित, असे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. परंतु, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून ही बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसून येते. येडशी येथील अंगणवाडीमध्ये (क्र.२३) वीस चिमुकले ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. परंतु, ज्या खोलीत विद्यार्थी बसतात, तेथे घुशीने उकीर काढले आहेत. उकिराच्या माध्यमातून निघालेली माती आणि मुरूम खोलीतच पडून आहे. त्यामुळे चिमुकल्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. आहार शिजविण्यासाठी किचनशेड उभारण्यात आले आहे. प्रत्यक्षात वर्गामध्येच आहार शिजविला जातो. याचाही त्रास चिमुकल्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत पालकांतून आता तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष न घातल्यास अंगणवाडीला टाळे ठोकू, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याबाबत येडशी बीटच्या सुपरवायजर पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की सदरील बाब ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात कळविल्याचे सांगितले. तर दोन ते तीन दिवसात दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे ग्रामविकास अधिकारी आनंद सोनटक्के म्हणाले.
घुशीच्या उकिरावर बसून चिमुकले गिरवताहेत धडे !
By admin | Updated: December 24, 2016 22:00 IST