कन्नड : तालुक्यातील औराळा शिवारातील प्रकाश निकम यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले आहे. बुधवारी रात्री या शिवारात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने घटनास्थळी चांगलीच धावपळ झाली. ही वार्ता औराळा गावात पसरताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ही माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच कन्नड परिक्षेत्रातील अधिकारी यांनी शीघ्र कृती दल घटनास्थळी पाठविले.
सहायक वनसंरक्षक तथा शीघ्र कृती दलाचे प्रमुख सचिन शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) ए. आर. पेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी प्रवीण कोळी, जी. एन. घुगे, वनरक्षक एन.टी.ए.सी. ताठे, शीघ्र कृती दलाचे सदस्य एम. ए. शेख, अमोल वाघमारे यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली व वन्यप्राण्याच्या पायाच्या ठशांचे नमुने घेतले. तसेच गावकऱ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. रात्री शेतात जाताना शेतकऱ्यांनी सोबत घुंगराची काठी, गळ्याभोवती रुमाल, हातामध्ये मोठी टॉर्च, मोबाइलमध्ये मोठ्याने गाणे वाजवणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
फोटो : शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देताना वन विभागाचे कर्मचारी.