लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील छताला गळती लागली असून, घाण व दुर्गंधीयुक्त पाणी छतातून टपकू लागल्याने अतिगंभीर असणाऱ्या रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. या छत गळतीकडे सर्वोपचार रुग्णालय प्रशासन व बांधकाम विभाग गांभीर्याने पाहत नसल्याची ओरड रुग्ण नातेवाईकांतून होत आहे. लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्ह्यातील आजारी रुग्णांसाठी बरे होण्यासाठी महत्वाचे केंद्र म्हणून जिल्ह्यातून हजारो रुग्ण उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयाकडे धाव घेतात. जिल्ह्यासह आंध्र व कर्नाटक सीमा भागातील रुग्णही उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात येत असल्याने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दोन वर्षांपूर्वीच बांधकाम विभागाने रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधून हस्तांतरीत करून दिली आहे. तरीही वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही इमारत अपुरी पडत असल्याने जुन्या इमारतीत अतिदक्षता विभाग चालविला जातो. अतिदक्षता विभागात अतिगंभीर रुग्ण उपचार घेत असतात. त्यामुळे हा विभाग वातानुकूलित आणि सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साहित्यांनी रुग्णसेवेसाठी सज्ज असतो. पण मागील दोन वर्षांपासून अतिदक्षता विभागाच्या छतामधून वर असलेल्या विभागातील शौचालयाचे दुर्गंधीयुक्त पाणी रुग्णांच्या अंगावर, डॉक्टरांच्या अंगावर पडते. त्यामुळे अतिगंभीर असणाऱ्या रुग्णांना जंतूसंसर्गाची भीती बळावली आहे. याबाबत संबंधित विभागाकडून वारंवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे लेखी कळविण्यात आले असले तरी त्यावर योग्य ती कारवाई झाली नसल्याने रुग्ण नातेवाईकांकडून याबाबत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अतिदक्षता विभागाच्या छताला गळती
By admin | Updated: May 27, 2015 00:40 IST