औरंगाबाद : गुंठेवारी क्षेत्राचा विकास, सर्व समाजाच्या धार्मिक स्थळांवर भाविकांसाठी सुविधा, मुंबईच्या धर्तीवर झोपडपट्टी विकास आणि ज्येष्ठांची कामे करण्यास प्राधान्य, अशी सामाजिक न्यायाची भूमिका राजेंद्र दर्डा यांनी ‘व्हिजन औरंगाबाद’ या आपल्या जाहीरनाम्यात मांडली आहे. राजकारण करीत असताना सामाजिक न्यायामध्ये सदैव अग्रेसर भूमिका घेणारे राजेंद्र दर्डा यांनी आतापर्यंत शहरात अनेक गल्ल्यांमध्ये दीडशे सिमेंट अथवा डांबरी रस्ते तयार केले आहेत. तितक्याच गल्ल्यांमध्ये ड्रेनेजलाईनची सुविधाही दिली आहे. सामाजिक न्यायाची ही भूमिका यापुढेही चालूच राहील, असा राजेंद्र दर्डा यांचा संकल्प आहे. शहरातील मोकळ्या जागांचा विकास करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचे आश्वासन त्यांनी ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये दिले आहे. गेल्या काही वर्षांत गुंठेवारी वसाहतींमधील नागरिकांना सोयी देण्यामध्ये राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही गुंठेवारी क्षेत्रात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येणार आहे. सिडकोतील नागरिकांची घरे स्वमालकीची व्हावीत यासाठी अधिक प्रयत्नही करण्यात येणार आहे. सर्व समाजाच्या धार्मिक स्थळांवर विविध प्रकारच्या सोयी- सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन राजेंद्र दर्डा यांनी दिले आहे. हज हाऊस आणि वंदेमातरम सभागृहाचे काम येत्या एक वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आली आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचा प्रश्न हाती घेऊन त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर शहरात ‘झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रमासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये स्पष्ट केले आहे. याबरोबरच वाढत्या औद्योगिकीकरणामध्ये शहराचे पर्यावरण संतुलन कायम राहावे, यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील मोकळ्या जागांवर आगामी पाच वर्षांत पाच लाख रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ज्येष्ठांची कामे प्राधान्याने होणार राजेंद्र दर्डा यांच्याशी घनिष्ठ नाते असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांवर आणि सुविधांवर ‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सर्व कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न, सरकारी कार्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खास व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची कामे प्राधान्याने व्हावीत यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात दिले आहे.
सामाजिक न्यायाची अग्रेसर भूमिका
By admin | Updated: October 13, 2014 00:35 IST