बीड : श्रेयासाठी नेत्यांमध्ये कायमच स्पर्धा असते. मात्र, एखादा प्रश्न प्रलंबित असताना आरोप-प्रत्यारोपांचे फटाके कसे फुटतात हे पहायचे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मूळ अतिरिक्त शिक्षकांकडे बघा. दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधींची गर्दी तर आहे मात्र वेतनाचा प्रश्न काही सुटत नाही.जि. प. शाळेतील २८७ मूळ अतिरिक्त शिक्षक आहेत. जागा रिक्त नसल्याने पदस्थापना मिळालेली नाही. काही शिक्षकांना पदस्थापना मिळाली मात्र तेथे ते विद्यार्थी संख्येनुसार अतिरिक्त ठरले.दीड ते दोन वर्षांपासून वेतन नसल्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीच्या तोंडावर ८ नोव्हेंबरपासून अतिरिक्त शिक्षक संघर्ष समिती स्थापन करून शिक्षकांनी लढा उभा केला. ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधले. शिक्षकांना दिलासा देण्यासाठी आ. जयदत्त क्षीरसागर, आ. अमरसिंह पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी मंत्री सुरेश नवले, बदामराव पंडित आले. शुक्रवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भेट दिली. तत्पूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी हजेरी लावून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बोलणे करून दिले. सर्वच नेत्यांनी आश्वासने दिली. काही नेते प्रधान सचिव, संचालकांना थेट बोलले. मात्र, प्रश्न काही तडीस गेला नाही. त्यामुळे दिग्गजांच्या भेटीनंतरही शिक्षक मागण्यांवर ठाम आहेत. (प्रतिनिधी)
नेत्यांची गर्दी हटेना, शिक्षकांचा प्रश्न सुटेना
By admin | Updated: November 14, 2015 00:52 IST