दत्ता थोरे, लातूर केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे पार्थिव लातूरच्या विमानतळावर आले आणि जिल्ह्यातील भाजपाचे पोलादी नेतेही लेकरांसारखे रडले. पार्थिव दर्शनासाठी ठेवल्यानंतर मंचावर प्रज्ञाताई आणि पंकजाताई जेव्हा रडू लागल्या तेव्हा तर जिल्ह्यातील नेते हमसून हमसून रडत होते. माजी आ. गोविंद केंद्रे यांनी तिरंग्याने लपेटलेल्या पार्थिवावर डोके ठेवून टाहो फोडला तेव्हा जणू उपस्थितांच्या काळजालाच हात घातला. आणि सर्वात विशेष म्हणजे फक्त भाजपाच नव्हे तर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपाइं अशा सर्वपक्षीय नेत्यांसह व्यापारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी दिवसभर हजेरी लावली. लातूरच्या विमानतळाला आज सर्वपक्षीय नेत्यांनी अश्रुंचा अभिषेक घातला. त्यातल्या त्यात भाजपा नेत्यांना आपल्या अश्रुंना रोखता आले नाही. पार्थिव आल्यानंतर रमेशअप्पा कराड, खा. डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आ. संभाजीराव निलंगेकर हे लहान लेकरे रडावीत तसे हमसून हमसून रडत होते. प्रज्ञाताई आणि पंकजातार्इंना शेजारी-शेजारी रडताना पाहून तर भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या अनावर झाल्या की सर्वच नेत्यांच्या डोळ्यातून आपल्या लाडक्या नेत्यांसाठी जणू अश्रूंचे झरे स्त्रवले. राज्यमंत्री अमित देशमुख, आ. वैजनाथ शिंदे, व्यंकट बेद्रे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पप्पू कुलकर्णी, मनसेचे अभय साळुंके, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, गंगाधर सरवदे, प्रा. व्यंकट कीर्तने, राष्टÑवादीचे मकरंद सावे, राकाँ प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, बबन भोसले यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी हजर होती. लातूर विमानतळावर अखेर कार्यकर्त्यांना मिळाली दर्शनाची संधी... गोपीनाथ मुंडे आणि लातूर यांचे नातेच वेगळे होते. ते जितके भाजपात लोकप्रिय होते तितकेच किंबहुना त्याहून जास्त विलासराव देशमुख यांचे जिवलग मित्र म्हणून लातूरच्या काँग्रेसमध्ये लोकप्रिय होते. गोपीनाथराव यांचे पार्थिव सुरूवातीला लातुरातून थेट परळीला विमानातून हेलिकॉप्टरने शिफ्ट करून विमानतळावरुनच नेण्याच्या हालचाली चालू होत्या. याची उद्घोषणाही लाऊडस्पीकरवरून करण्यात आली होती. परंतु राज्यमंत्री अमित देशमुख, आ. वैजनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांच्यासह माजी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेशअप्पा कराड, आ. सुधाकर भालेराव, खा. सुनील गायकवाड आदींनी राजीव प्रताप रुडी यांची भेट घेऊन लातूरमधील कार्यकर्त्यांसाठी पार्थिव थोडा वेळ का होईना ; विमानतळावर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही मागणी मान्य करून २० मिनिटांसाठी पार्थिव विमानतळावर ठेवले. अंत्यदर्शनाला भाजपासह काँग्रेसच्या नेत्यांचीही मोठी गर्दी होती.
पितृतुल्य मुंडेंसाठी नेतेही लेकरांसारखे रडले..!
By admin | Updated: June 5, 2014 00:47 IST