औरंगाबाद : केंद्र शासनाने देशभरात आठ ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. औरंगाबादेतही एक क्लस्टर स्थापन केले जाणार आहे. या क्लस्टरचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आल्याची माहिती सीएमआयए या औद्योगिक संघटनेतर्फे देण्यात आली आहे. शेंद्रा एमआयडीसीमध्ये क्लस्टर स्थापनेसाठी जागेची मागणी करणारा अर्ज एमआयडीसीकडे देण्यात आलेला आहे. प्रत्येक क्लस्टरला ५० कोटींचा निधी मिळणार आहे. औरंगाबादेतील ब्रोवनफिल्ड क्लस्टरसाठी सीएमआयच्याअंतर्गत देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर, औरंगाबाद ही कंपनी स्थापन केली आहे. केंद्र सरकारच्या विशेष प्रोत्साहन पॅकेज अंतर्गत ब्रोवनफिल्ड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरअंतर्गत विद्यमान क्षमतेत २५ टक्क्यांपेक्षा जास्त विस्तार करणाऱ्या उद्योगांना भांडवल खर्च परतावा दिला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची वाढती आयात बघता केंद्राने क्लस्टर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भारतात आठ शहरांमध्ये क्लस्टर स्थापनेस मंजुरी देण्यात आली. यामध्ये औरंगाबाद, गाझियाबाद, बडोदा, अहमदनगर, गांधीनगर, नाशिक, नागपूर, ठाणे या शहरांचा समावेश आहे. सीएमआयए या औद्योगिक संघटनेने क्लस्टर स्थापनेसाठी पुढाकार घेतला. इंडियन इलेक्ट्रॉनिक अँड सेमिकंडक्टर असोसिएशन आणि आयएलएफएस यांच्यासह इलेक्ट्रॉनिक उत्पादक उद्योगांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर कंपनी स्थापन करण्यात आली.
एमआयडीसीकडे जागेची मागणी
By admin | Updated: March 28, 2015 00:47 IST