औरंगाबाद : वाढत्या बेरोजगारीच्या काळात निदान शिपाई पदाची तरी नोकरी मिळावी, यासाठी पदवीधर तरुण प्रयत्न करीत असतो. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना आणि त्यांच्या पालकांना गाठून नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरात अशाच प्रकारे दोन जणांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल पावणेसात लाख रुपयांना गंडविण्यात आले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हर्सूल पोलिसांनी सांगितले की, नंदनवन कॉलनी येथील सुधाकर यशवंत साठे यांचा मुलगा बेरोजगार असल्याने ते त्याच्यासाठी नोकरीचा शोध घेत होते. त्यांची ओळख आरोपी शेख हदी शेख मजहर (रा. जुना पोस्ट कार्यालय परिसर) याच्या सोबत झाली. त्याने आपली शैक्षणिक संस्था असल्याचे साठे यांना सांगितले. आपल्या जाधववाडी येथील मारुतीनगर येथील ममता बालगृह संस्थेत काळजीवाहक या पदावर नोकरी लावून देतो, वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत आपली ओळख असून त्याचा लाभ होईल, असे त्यांना सांगितले.या नोकरीसाठी त्याने साडेसात लाखो रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे साठे यांनी आरोपीला सांगितले. शिवाय त्यांच्या पुतण्याने मध्यस्थी केल्याने आरोपी साडेपाच लाख रुपयांत नोकरी लावण्यास तयार झाला. त्यानंतर त्याने साठे यांच्याकडून साडेपाच लाख रुपये घेतले. आरोपीने त्यांच्या मुलास बोगस नियुक्तीपत्र दिले आणि ममता बालगृह येथे येऊन रजिस्टरवर सह्या करण्यास सांगितले. शासकीय कार्यालयातून पदाला मान्यता मिळेपर्यंत पंधरा दिवसांतून एकदा येऊन सह्या केल्या तरी चालेल असे सांगितले. त्यामुळे जून २०१३ ते नोव्हेंबर २०१४ पर्यंत ममता बालगृह येथे जाऊन त्याने रजिस्टरवर सह्या केल्या. दरम्यान, नोव्हेंबर २०१४ पासून तो आणि सह्यांचे रजिस्टर गायब असल्याचे दिसले. तेव्हापासून साठे हे आरोपींचा शोध घेत आहेत. शेवटी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रकरण हर्सूल पोलीस ठाण्याकडे वर्ग केल्याचे पोलीस निरीक्षक वसीम हाशमी यांनी सांगितले.
नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा
By admin | Updated: December 1, 2015 00:29 IST