राजेश खराडे बीडबार्शी नाक्यावरील बिंदुसरा नदीपुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दोन महिन्यांपासून बसगाड्यांची वाहतूक बाह्यमार्गावरून होत आहे. अंतर वाढल्याने एक टप्प्याचे तिकीट वाढले असून, वेळेच्या अपव्ययाबरोबरच प्रवाशांना यादरम्यान दोन लाखांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. शिवाय, आगाराच्या उत्पादनातही घट झाली आहे.अतिवृष्टीमुळे बिंदुसरा नदीपुलाची दुरवस्था झाली होती. पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत बीड आगारातून मार्गस्थ होणाऱ्या बसगाड्या ११ नोव्हेंबरपासून मोंढा रोड, खंडेश्वरी मंदिर, नाळवंडी नाका, तेलगाव मार्गे मांजरसुंब्याकडे मार्गस्थ होत होत्या. त्यामुळे प्रतिफेरी ३ ते ४ कि.मी. अंतराची वाढ झाल्याने ६ रुपयांनी तिकीटदरही वाढले होते. या दरवाढीमुळे आगाराला २ लाख २९४ रुपये मिळाले असले तरी त्या बदल्यात खराब रस्त्यांमुळे बसगाड्यांची दुरवस्था, प्रवाशांची गैरसोय, वेळेचा अपव्यय, शिवाय नाहक त्रासामुळे प्रवासी दुरावला आहे.बसचे प्रवाशांसह वजन १० ते १२ टन असल्याचा अहवाल आगाराकडून देण्यात आला असतानादेखील जिल्हा प्रशासनाकडून त्याकडे कानाडोळा करीत वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल दोन महिन्यानंतर बिंदुसरा नदी पुलालगत पर्यायी मार्ग तयार करण्यात आला असून, सोमवारपासून या मार्गावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या कालावधीत आगाराचे उत्पादन घटले असल्याने याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून खुलासाही मागविण्यात आला होता. त्यानुसार बीड विभागाने पत्रव्यवहार केला असून, त्वरित पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी देखील केली आहे.
प्रवाशांना लाखोंचा भुर्दंड
By admin | Updated: January 7, 2017 23:03 IST