उस्मानाबाद : हातात निळे झेंडे..., मुखातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकमुखी जयघोष करीत जिल्हाभरात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ वा जयंती उत्सव मोठ्या थाटात पार पडला. शुक्रवारी पहाटेपासूनच उस्मानाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक शहरवासियांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. असेच चित्र इतर शहरातही दिसून येत होते. दुपारनंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी रस्त्यावर अवघा निळा समुद्र अवतरल्याचे चित्र होते. उस्मानाबादसह प्रमुख शहरात रात्री उशिरापर्यंत मिरवणुकांची रेलचेल सुरु होती. या मिरवणुका आबालवृद्धांसह महिलांची संख्याही लक्षणीय होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकर चौक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते़ जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती़ यानिमित्त आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या तर्फे मोफत पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता़ तर भीमा कोरेगाव वॉरिअर्स ग्रुपच्या झांज पथकाने मानवंदना दिली़ तसेच सत्यशोधक नाभिक विचारमंचच्या वतीने पाणी वाटप, इतर संस्था, संघटनांच्यावतीने मठ्ठा वाटप, अन्नदान आदी उपक्रम राबविण्यात आले़ माजी खा़ डॉ़ पद्मसिंह पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ यासह इतर पक्ष-संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनीही महामानवास अभिवादन केले़ शहरातील भिमनगर भागातून सायंकाळच्या सुमारास जंगी मिरवणूक काढण्यात आली़ या मिरवणुकीत युवकांनी सहभाग नोंदविला होता़ रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक चालली़सामाजिक समता सप्ताहाची सांगताशासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सामाजिक समता सप्ताहाची शुक्रवारी सांगता झाली़ प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपविभागीय दंडाधिकारी तथा परिक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्वाती इथापे, सहाय्यक आयुक्त एस.एस. मते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे, संशोधन अधिकारी संतोष जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते़रूग्णांना फळांचे वाटपतुळजापूर : येथील फे्रंडस् ग्रुपच्या वतीने शासकीय रुग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी सोमनाथ निटूरे, धनंजय मुळे, सतीश हुंडेकरी, आण्णा दळवी, शिवाजी साखरे, राजू गायकवाड, प्रसाद डांगे, डी. डी. हुंडेकरी, दयानंद सुरवसे, तात्यासाहेब माळी, शांतीलाल घुगे, उमेश सुर्वे, सुरेश राऊत, युवराज पुरी, ज्ञानेश्वर घोडके, अशोक खडके आदी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘लई मजबूत भीमाचा किल्ला’
By admin | Updated: April 15, 2017 00:28 IST